आळंदी (Pclive7.com):- कोरोनाच्या पार्श्वभूमीवर तीर्थक्षेत्र आळंदी येथे माऊलींच्या मंदिरात मास्क वापरण्याचे आवाहन संस्थानकडून करण्यात आले आहे. श्री ज्ञानेश्वर महाराज संस्थान कमिटी आळंदीच्या वतीने दि.३० डिसेंबर रोजीच्या प्रसिद्धी पत्रकाद्वारे देवस्थानचे प्रमुख विश्वस्त योगेश देसाई यांनी भाविकांना विनम्र आवाहन केले आहे.
चीन, अमेरिका, जपानसह अनेक देशांमध्ये कोरोनाची नवी लाट आली आहे. या देशांमध्ये संसर्गाचा फैलाव झपाट्याने होत असल्याने आपल्याकडे केंद्र आणि राज्य सरकारने सावधान राहण्याच्या सूचना दिलेल्या आहेत. या संसर्गाचा संभाव्य फैलाव रोखणे हे शासनाबरोबर आपणा सर्वांचेही कर्तव्य आहे. तीर्थक्षेत्र आळंदी येथे येणारे भाविक, वारकरी, ग्रामस्थ व अन्य दर्शनार्थी तसेच व्यापक सामाजिकहित विचारात घेऊन श्री ज्ञानेश्वर महाराज संस्थान कमिटी, आळंदीच्या वतीने सर्वांना विनम्र आवाहन करण्यात आले आहे.
संतश्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर महाराज संजीवन समाधी व मंदिर परिसरात गर्दी करू नये. वयोवृद्ध, लहानमुले तसेच आजारी व्यक्ती यांनी शक्यतो गर्दीच्या ठिकाणी जाऊ नये. मंदिर व मंदिर परिसरात सर्वांनी मास्क घालून प्रवेश करावा असे मंदिर प्रसाशनाच्या वतीने आवाहन करण्यात आले आहे. भाविकांनी आपल्या आरोग्याची काळजी घेण्यासाठी हे आवाहन करण्यात आले असुन याबाबतची माहिती देवस्थानचे व्यवस्थापक ज्ञानेश्वर वीर यांनी दिली.