पिंपरी (Pclive7.com):- पिंपरी चिंचवड महापालिकेच्या मोरवाडी आणि कासारवाडी येथील आयटीआय शुल्कामध्ये कपात करण्यात आली आहे. अवघ्या दीड हजार रुपयात औद्योगिक तंत्र शिक्षण घेणे सोपे होणार आहे. या निर्णयामुळे विद्यार्थ्यांनी आनंद व्यक्त केला. भाजपच्या नगरसेविका अनुराधा गोरखे यांनी शुल्कात कपात करण्याबाबत महापालिकेकडे सतत पाठपुरावा केला होता. त्यांच्या पाठपुराव्याला अखेर यश आले आहे.
मोरवाडी आणि कासारवाडी आयटीआय खासगी वर्गात मोडत आहे. त्यांनाही राज्य सरकारची प्रवेश नियामवली आणि शुल्कप्रणाली लागू आहे. त्यानुसार २० हजार रुपये शुल्क, महिला प्रशिक्षणार्थींकडून १० हजार रुपये शुल्क आकारले जाते. हे शुल्क अधिक होते. शुल्कामध्ये कपात करण्याची मागणी भाजपच्या नगरसेविका अनुराधा गोरखे यांनी महापालिकेकडे केली होती. याबाबत वारंवार पालिकेककडे पाठपुरावा सुरु केला होता.
त्यानुसार महापालिका कल्याणकारी योजनेअंतर्गत तरुणांना अधिक सेवा उपलब्ध करुन देण्याच्या उद्देशाने सुधारित ‘प्रवेश प्रक्रिया आणि प्रशिक्षण शुल्क धोरण २०१७’ हा मसुदा तयार करण्यात आला. या धोरणानुसार पालिका हद्दीतील प्रशिक्षणार्थींसाठी मोरवाडी आणि कासारवाडी आयटीआयमध्ये अवघ्या दीड हजार रुपये वार्षिक प्रशिक्षण शुल्क राहणार आहे.
नगरसेविका अनुराधा गोरखे म्हणाल्या, मोरवाडी येथील आयटीआय मध्ये मोठ्या प्रमाणात गोरगरीब विद्यार्थी प्रवेश घेतात. येथील विविध कोर्सेमुळे विद्यार्थी स्वत:च्या पायावर उभे राहतात. त्यांचे भवितव्य घडते. आयटीआयमध्ये पूर्वी १२०० रुपये एवढे शुल्क होते. परंतु, पालिकेने त्यामध्ये वाढ करुन २० हजार रुपये केले होते. २० रुपये शुल्क अधिक होते. त्यामुळे गोरगरीब विद्यार्थी शिक्षणापासून वंचित राहिले असते. शुल्क कमी करण्याबाबत पालिकेकडे वारंवार पाठपुरावा केला. त्याबाबत आयुक्त श्रावण हर्डीकर यांच्याशी चर्चा, बैठका घेतल्या. त्यानंतर पालिकेने शुल्कात कपात करुन दीड हजार रुपये केली आहे. या निर्णयामुळे विद्यार्थ्यांना अवघ्या दीड हजार रुपयात औद्योगिक तंत्र शिक्षण घेणे सोपे होणार असून गोरगरीब विद्यार्थ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. शुल्कात कपात केल्याबाबत महापालिका आयुक्तांचे मी आभार मानते.