पिंपरी (Pclive7.com):- पहिल्याच फेजमध्ये पुणे मेट्रो निगडीपर्यंत आणण्याची मागणी करीत आज सामाजिक संस्था कनेक्टीयन यांच्या बॅनरखाली पिंपरी चिंचवड सिटीझन फोरमच्या (पीसीसीएफ) सदस्य, तसेच शहरातील विविध संघटनांनी पिंपरी चौकात मानवी साखळी केली. ‘बापट साहेब पिंपरी चिंचवडकरांना न्याय द्या, पहिल्याच फेजमध्ये मेट्रो निगडी पर्यंत न्या’ असे फलक हातात धरून जोरदार घोषणाबाजी करण्यात आली.
पुण्यात व पिंपरी चिंचवड शहरात मेट्रोचे आगमन होत आहे. पिंपरी चिंचवडसाठी ही अभिमानाची गोष्ट आहे. तसेच शहराकरीता सोयीची देखील आहे. परंतु प्रथम फेजमध्ये मेट्रो पिंपरी पर्यंतच येत आहे. निगडी बसस्थानकावरून पुणे शहराकडे जाण्यासाठी बसेस पूर्ण भरुन जातात. तसेच या भागात शैक्षणिक संकुले, शासकीय कार्यालये, कामगार निवासस्थाने, शहरातील पर्यटनस्थळे, वाहतूक नगरी व अन्य महत्वाची ठिकाणे आहेत. त्यामुळे मेट्रो पहिल्या टप्प्यात निगडीपर्यंत होणे आवश्यक आहे. पुणे मेट्रो पहिल्याच फेजमध्ये निगडीपर्यंत नेण्याच्या मागणीसाठी पिंपरी चिंचवड सिटीझन फोरमच्या वतीने कनेक्टींग एनजीओच्या अंतर्गत आज पिंपरी येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौकात मानवी साखळीचे आयोजन करण्यात आले होते.
या मानवी साखळीमध्ये पिंपरी चिंचवड शहरातील विविध संघटनांनी उत्स्फूर्त प्रतिसाद नोंदविला. यामध्ये पोलीस नागरिक मित्र, ज्येष्ठ नागरिक महासंघ पिंपरी चिंचवड, स्वातंत्र्यवीर सावरकर मंडळाची निसर्ग मित्र संघटना, स्टेट बँक ऑफ इंडिया पेंशनर्स असोसिएशन्स पिंपरी चिंचवड युनिट, सांस्कृतिक संवर्धन व विकास महासंघ, रोटरी क्लब ऑफ वाल्हेकरवाडी इत्यादी संघटनांनी सहभाग नोंदविला.
प्रत्येकाने पुणे मेट्रो निगडीपासून सुरू व्हावी यासाठी हातात फलक घेतले होते. केवळ फलकांच्या माध्यमातून जनजागृती करत कुठलीही निदर्शने अथवा घोषणा न देता शांततेच्या मार्गाने ही मानवी साखळी काढण्यात आली. ‘पुणे मेट्रो पहिल्या फेजमध्ये निगडीपर्यंत पोहोचली तरच पिंपरी- चिंचवड शहराला पूर्णपणे न्याय मिळणार आहे’, ‘गर्दीचा आणि त्रासाचा प्रवास सुखकर करण्याची हीच खरी वेळ आहे’, ”पिंपरी चिंचवडकरांचे एकच मागणे, पहिल्या फेजमध्ये मेट्रो निगडीपर्यंत आणणे’, ‘बापट साहेब ! पिंपरी चिंचवडकरांना न्याय द्या. पहिल्या फेजमध्ये मेट्रो निगडीपर्यंत न्या’, ‘गर्दीचा, रात्रीचा प्रवास किती दिवस सहन करायचा, अन्य शहरांप्रमाणे मेट्रोचा सुखद प्रवास कधी व्हायचा’ अशा प्रकारचे संदेश फलकाच्या माध्यमातून यावेळी देण्यात आले.
पुणे मेट्रो हा ११.५ हजार कोटींचा प्रकल्प आहे. यामध्ये केवळ आणखी सहा टक्के रक्कम वाढवली तर पुणे मेट्रो थेट निगडीपर्यंत जाऊ शकते. निगडी परिसरात सुमारे साडेसहा लाख लोक राहतात. तसेच तळवडे, रावेत, चाकण या भागांसाठी निगडीतून पोहोचणे सहज शक्य आहे. निगडीपर्यंत मेट्रो आल्यास इथे ट्रान्सपोर्ट हब देखील करता येईल. यामुळे पिंपरी चिंचवडच्या नावलौकिकात आणखी भर पडेल. पुणे मेट्रो पहिल्या टप्प्यात निगडीपर्यंत पोहोचण्यासाठी पिंपरी चिंचवड सिटीझन फोरमच्या वतीने मागील एक वर्षापासून स्थानिक आमदार, खासदार व नगरसेवकांची भेट घेऊन निवेदने देण्यात आली आहेत. मात्र हे निवेदन स्वीकारताना सर्वांनी केवळ आश्वासनांव्यतिरिक्त काहीही प्रतिसाद दिलेला नाही, अशी खंत पिंपरी चिंचवड सिटीझन फोरमकडून व्यक्त करण्यात येत आहे.






















Join Our Whatsapp Group