पिंपरी (Pclive7.com):- पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या बांधकाम परवाना आणि अनधिकृत बांधकाम नियंत्रण विभागाने २०२३-२४ या आर्थिक वर्षासाठी महसुली उत्पन्नात ८०४ कोटी रुपयांचा टप्पा ओलांडला आहे. मागील वर्षीपेक्षा या उत्पन्नामध्ये २० कोटी रुपयांची वाढ झाली आहे.
२०२३-२४ आर्थिक वर्षाच्या सुरुवातीच्या सहामाहीत, विभागाच्या महसुलात घट झाली होती. जेथे उत्पन्नाच्या केवळ २८ टक्के म्हणजेच २२४ कोटी रुपये जमा झाले होते. त्यानंतरच्या तिमाहीमध्ये महापालिकेने धोरणांची परिणामकारकता दाखवून उत्पन्नात उल्लेखनीय बदल घडवून आणले. तिसऱ्या तिमाहीत विभागाच्या उत्पन्नात २४ टक्के वाढ दिसून आली. तर डिसेंबर २०२३ अखेरीस उत्पन्नात ४१५ कोटी रुपयांहून अधिक वाढ झाली.
गेल्या तिमाहीत उत्पन्नामध्ये ४८ टक्क्यांनी वाढ..
आर्थिक वर्षातील कामगिरीमध्ये गेल्या तिमाहीत बांधकाम परवाना विभागाच्या उत्पन्नात विक्रमी ४८ टक्के वाढ झाली आहे. या उत्पन्न वाढीमध्ये पिंपरी चिंचवड शहरातील बांधकाम व्यावसायिकांचा मोलाचा वाटा आहे. यामध्ये ३८९ कोटी रुपयांचा भरणा पिंपरी चिंचवड शहरातील बांधकाम व्यावसायिकांडून करण्यात आला आहे.
– शेखर सिंह, आयुक्त तथा प्रशासक, पिंपरी चिंचवड महानगरपालिका
वर्षाच्या सुरूवातीला आव्हानांचा सामना करूनही उल्लेखनीय कामगिरी..
महापालिकेच्या बांधकाम परवाना आणि अनधिकृत बांधकाम नियंत्रण विभागाने २०२३-२४ या आर्थिक वर्षातील महसुलात ८०४ कोटी रुपयांचा टप्पा ओलांडण्याची उल्लेखनीय कामगिरी केली आहे. आर्थिक वर्षाच्या सुरुवातीच्या सहामाहीत आव्हानांचा सामना करूनही सामुहिक प्रयत्नांमुळे प्रशंसनीय परिणाम मिळाले असून त्यानंतरच्या तिमाहीत महसुलात लक्षणीय वाढ झाली आहे. महसूल निर्मिती वाढविण्यासाठी महापालिकेच्या धोरणांची परिणामकारकता याद्वारे दिसून येते.
– प्रदीप जांभळे पाटील, अतिरिक्त आयुक्त, पिंपरी चिंचवड महानगरपालिका
२०२४-२५ या आर्थिक वर्षात १०० टक्के महसुल गोळा करण्याचे लक्ष्य..
शहराच्या एकूण आर्थिक प्रगतीमध्ये योगदान देत असताना बांधकाम व्यावसायिकांचा महापालिकेच्या महसुलामध्येही महत्वाचा वाटा आहे. बांधकाम उपक्रमांच्या उत्पन्नात झालेली वाढ ही पिंपरी चिंचवड शहरात होत असलेल्या विकासाचा पुरावा आहे. २०२४-२०२५ या आर्थिक वर्षासाठी १०० टक्के महसुल गोळा करण्याचे महापालिकेचे लक्ष्य असणार आहे.
– मकरंद निकम, शहर अभियंता, पिंपरी चिंचवड महानगरपालिका.