पिंपरी (Pclive7.com):- यशवंतराव चव्हाण मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावर हायवे ट्रॅफिक मॅनेजमेंट सिस्टीम अंतर्गत मुंबई व पुणे वाहिनीवर कि.मी. ९३/९०० येथे बुधवार दि.३ आणि गुरूवार दि.४ एप्रिल २०२४ रोजी दुपारी १२ ते २ या दरम्यान गॅन्ट्री बसविण्याचे काम महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळामार्फत करण्यात येणार असून गॅन्ट्री बसविताना मुंबई व पुणे वाहिनीवरील सर्व प्रकारच्या हलक्या व जड अवजड वाहनांची वाहतूक पूर्णतः बंद राहील.
वाहनधारकांना पर्यायी मार्गाने प्रवास करता येईल. द्रुतगती मार्गावरुन पुणे ते मुंबईकडे जाणारी सर्व प्रकारची वाहने किवळे ब्रिज वरून जुना मुंबई – पुणे मार्गाने मुंबईच्या दिशेने वळविण्यात येतील. मुंबईहून पुण्याकडे जाणारी सर्व प्रकारची वाहने कुसगाव टोलनाका कि.मी ५५.००० वरुन (लोणावळा एक्झीट) येथून जुना मुंबई -पुणे मार्गावरुन पुणेच्या दिशेने मार्गस्थ होतील, असे महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाने कळविले आहे.