पुणे (Pclive7.com):- लोकसभेसाठी वंचित बहुजन आघाडीने (दि.२) पाच उमेदवारांच्या नावाची घोषणा केली. यामध्ये पुणे लोकसभा मतदारसंघातून वसंत मोरे यांना ‘वंचित’कडून उमेदवारी देण्यात आली आहे. काही दिवसांपूर्वी वसंत मोरे यांनी वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांची भेट घेत उमेदवारी संदर्भात चर्चा केली होती. यानंतर अखेर वसंत मोरे यांना ‘वंचित’कडून उमेदवारी जाहीर झाली आहे. यासंदर्भातील माहिती वंचित बहुजन आघाडीने ट्विटरवरून दिली आहे.
पुणे लोकसभा मतदारसंघात काँग्रेसकडून रवींद्र धंगेकर तसेच भाजपाकडून मुरलीधर मोहोळ निवडणुकीच्या मैदानात आहेत. आता वंचित बहुजन आघाडीकडून वसंत मोरे यांना उमेदवारी जाहीर झाल्यामुळे पुण्यात तिरंगी लढत होणार आहे. वसंत मोरे यांनी काही दिवसांपूर्वी मराठा नेते मनोज जरांगे पाटील यांचीदेखील भेट घेतली होती. तसेच खासदार शरद पवार यांचीही भेट घेतली होती. वसंत मोरे यांनी या भेटी पुण्यातून उमेदवारी मिळण्यासंदर्भात घेतल्याचे सांगितले जात होते.
‘वंचित’ने या ५ उमेवारांची केली घोषणा..
वंचित बहुजन आघाडीने आघाडीने अधिकृत ट्विटर अकाऊंटवरुन उमेदवारांची घोषणा केली. यामध्ये अविनाश भोसिकर-नांदेड (लिंगायत), बाबासाहेब भुजंगराव उगले-परभणी (मराठा), अफ्सर खान-छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद) (मुस्लिम), वसंत मोरे-पुणे (मराठा), मंगलदास बांदल-शिरुर (मराठा), या पाच उमेदवारांची यादी ट्विटरवरुन जाहीर केली आहे.