पिंपरी (Pclive7.com):- लोकसभा निवडणूक भयमुक्त, पारदर्शक, निष्पक्षपातीपणे पार पाडण्यासाठी पोलिसांनी सराईत गुन्हेगार व टोळ्यांवर कारवाईचा धडाका सुरू केला आहे. पोलिस आयुक्त विनयकुमार चौबे यांनी आणखी एक दणका देत भोसरी येथील जगताप टोळीवर महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण अधिनियम (मोका) अंतर्गत कारवाई केली.
टोळीप्रमुख आदर्श ऊर्फ कुक्या गोविंद जगताप (वय २२), सुनील राणोजी जावळे (२६, दोघेही रा. आदर्श नगर, मोशी), रोहित ऊर्फ कक्या ज्ञानेश्वर सोनवणे (१९, रा. भोसरी) अशी कारवाई झालेल्यांची नावे आहेत. भोसरी पोलिस ठाण्यात दाखल असलेल्या खुनाच्या प्रयत्नाच्या गुन्ह्याचा तपास करत असताना जगताप टोळीच्या सदस्यांनी संघटित गुन्हेगारी टोळी बनवून गुन्हे केल्याचे समोर आले. टोळीतील संशयितांवर भोसरी, दिघी, वाकड, फरासखाना पोलिस ठाण्याच्या हद्दीत खून, खुनाचा प्रयत्न, दुखापत, जबरी चोरी, चोरी, हत्यार बाळगणे अशा प्रकारचे १३ गुन्हे दाखल आहेत.
निवडणुका शांतेत पार पाडण्यासाठी पोलिसांनी सराईत गुन्हेगारी टोळ्यावर कारवाई केली आहे. तसेच पोलिसांनी रात्रीच्या वेळी गस्त वाढविली आहे. तपासणी नाके सुरू केले आहेत.
सदरची कारवाई अपर पोलिस आयुक्त्त वसंत परदेशी, उपायुक्त (गुन्हे) संदीप डोईफोडे, उपायुक्त (परिमंडळ १) स्वप्ना गोरे, सहायक आयुक्त (गुन्हे १) बाळासाहेब कोपनर यांच्या मार्गदशनाखाली वरिष्ठ पोलिस निरीक्षक नितीन फटांगरे, पोलिस निरीक्षक अनिल देवडे, पोलिस अंमलदार सचिन चव्हाण, व्यंकप्पा कारभारी यांच्या पथकाने ही कामगिरी केली.