चिंचवड (Pclive7.com):- वाकड ते बालेवाडीला जोडणारा नवीन पूल वाहतुकीसाठी खुला करण्यात यावा अशी मागणी माजी नगरसेवक अतुल शितोळे यांनी केली आहे. शितोळे यांनी यासंदर्भात जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांच्याकडे निवेदनाद्वारे मागणी केली आहे.

अतुल शितोळे यांनी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, पुणे महापालिकेतील बाणेर बालेवाडी आणि पिंपरी-चिंचवड महापालिकेतील वाकड, पिंपळे सौदागर, पिंपळे निलख हा परिसर मूळा नदीमुळे विभागला आहे. गेल्या २ दशकापासून या परिसरातील हिंजवडी येथे असणाऱ्या आयटी पार्क मध्ये कामावर जाण्यासाठी लाखों कर्मचारी या भागातून ये-जा करत असतात. तसेच बालेवाडी येथे असणारे क्रीडा संकुल विविध शैक्षणिक संस्था, महाविद्यालय व हॉस्पिटल यामुळे या भागात वाहतूक व दळण-वळण सुलभ व्हावे यासाठी पुणे महापालिका आणि पिंपरी चिंचवड महापालिका यांच्या संयुक्त विद्यमाने जवळपास १० वर्षापूर्वी २०१३ साली बाणेर- बालेवाडी या भागास जोडण्यासाठी वाकड, पिंपळे निलख या भागातून मूळा नदीवर पूल बांधण्याची निविदा मंजूर होऊन कामास सुरुवात करण्यात आली. या पूलाचे काम पुणे महापालिकेच्या प्रकल्प विभागाकडून सुरू करण्यात आले होते. सदर पूलाची लांबी ही १७५ मी. व रुंदी ३० मी. आहे. जून २०१३ ते २०१७ या कालावधीत ही काम करत असताना ठेकेदाराने काम सोडून दिल्यामुळे पुन्हा दूसरा ठेकेदार नियुक्त करण्याची नामुष्की आली होती.
जून २०१३ ते २०१७ या कालावधीत पहिल्या ठेकेदाराने १६ कोटी २३ हजार ४७ रु. चे काम केले. २०१७ ते १९ दरम्यान पहिल्या ठेकेदार सोडून गेल्याने पुन्हा दूसरा ठेकेदार नियुक्त करण्यास जवळपास २ वर्षाचा कालावधी गेला. २०१९ ते २१ (ऑगस्ट) या काळात दुसऱ्या ठेकेदाराने या दोन वर्षात काम पूर्ण केले. त्यासाठी ९ कोटी १७ लाख ८४ हजार ८४९ रु. इतका खर्च करण्यात आला. म्हणजे तब्बल अंदाजे २६ ते २७ कोटी रु. इतका खर्च. या पूर्ण प्रकल्पासाठी दोन महापालिका मिळून आला आहे. जवळपास तीन-चार वर्षानंतरही हा पूल पूर्ण होऊन देखी पुणे महापालिकेतील बालेवाडी येथील पुलास जोडणाऱ्या जोड रस्त्याचे काम अद्यापही होऊ शकले नाही. पुणे, महापलिकेतील बालेवाडी येथील ममता चौक ते पूल दरम्यानचे अंतर जवळपास दीड की.मी. आहे. यांपेकी बालेवाडी येथील ममता चौक ते रेसीडेनसी दरम्यानचा रस्ता जवळ पास ४०० मी लांबीचा पूर्ण झाला आहे. या पूलास लागून असलेली खासगी मालकी हक्क असलेली २०० मी वा अन्य एक ठिकाणची १०० मी जागा भूसंपादन अभावी अद्यापही ताब्यात आली नसल्याने पुलाचे काम पूर्ण होऊन देखिल पुणे महापालिकेतील बालेवाडी भागातल्या जोड रस्त्याचे काम न झाल्याने करोडो रु खर्च होऊन हा पूल सार्वजनिक वाहतुकीसाठी अद्यापही बंद आहे.
सध्या तरी आडगळ असलेला पूल हा अनेक अवैध्य धंद्याचे आगर बनला आहे. हा पूल मद्यपींसाठी तर भर दिवसाही सर्वात सेफ जागा झाली आहे. पुलावर सर्वत्र दारूच्या बाटल्यांचा खच पडला आहे. काहींनी या पुलावर जुगार, मटका सुरू केला आहे. नेहेमीच या पुलावर अवजड व मालवाहक वाहनांची अनधिकृत पार्किंग केलेली असते. तीन पोलिस ठाण्याचे हद्द असल्याने पोलिस देखिल या अनधिकृत व अवैध धंद्याकडे कान-डोळा करत आहेत.
तरी हा पूल सार्वजनिक वाहतुकीसाठी खुला करण्यात यावा, की जेणेकरून पुलाचा उपयोग ज्या मूळ उदेशासाठी केला होता तो पूर्ण होइल व दोन्ही महानगरपालिकेतील दळण-वळण व्यापार व दोन्ही भाग एकमेकांना खऱ्या अर्थाने जोडण्यात येईल. तरी आपण योग्य ते निर्देश प्रशासनास द्यावेत व हा पूल सार्वजनिक वाहतुकीसाठी लवकरात लवकर खुला करावा अशी मागणी अतुल शितोळे यांनी पालकमंत्री अजित पवार यांच्याकडे केली आहे.