चिंचवड (Pclive7.com):- चिंचवड विधानसभा मतदारसंघात ६ लाख ४३ हजार ७६९ मतदार असलेली अंतिम मतदार यादी उप जिल्हा निवडणूक अधिकारी मीनल कळसकर यांच्या हस्ते नुकतीच प्रसिद्ध करण्यात आली आहे. या मतदार संघात वाढलेला मतदार दुबार, बोगस, मयत अशाप्रकारचा आहे. त्यामुळे चिंचवड विधानसभेचे फेर सर्वेक्षण करून नव्याने मतदार डाटा तयार करण्यात यावा अशी मागणी माजी नगरसेवक ॲड. संदीप चिंचवडे यांनी केली आहे.

ॲड. संदीप चिंचवडे यांनी यासंदर्भात निवडणूक आयोग, जिल्हा निवडणूक विभागाला निवेदन दिले आहे. त्यात म्हटले आहे की, भारत निवडणूक आयोगाच्या विशेष संक्षिप्त पुनरीक्षण कार्यक्रमानुसार जिल्ह्याची अंतिम मतदार यादी उप जिल्हा निवडणूक अधिकारी मीनल कळसकर यांच्या हस्ते प्रसिद्ध करण्यात आली. या यादीनुसार चिंचवड विधानसभा मतदार संघात ५६१ मतदान केंद्र, ३ लाख ३९ हजार ७२७ पुरुष, ३ लाख ३ हजार ९८९ महिला आणि तृतीयपंथीय ५३ असे ६ लाख ४३ हजार ७६९ मतदार असल्याचे जाहीर केले आहे.
परंतु चिंचवड मतदार संघातील वाढलेला मतदार दुबार, बोगस, मयत अशा प्रकारचा आहे. यात अनेक वर्षे कसल्याही सुधारणा होताना दिसत नाही. आज सुद्धा ५० हजार पेक्षा जास्त मतदार चिंचवड विधानसभेच्या बाहेरचे आहेत, ते या विधानसभेचे भविष्य ठरवतात. त्यामुळे चिंचवड विधानसभा मतदारसंघाचे फेर सर्वेक्षण करून नव्याने मतदार डाटा तयार करण्यात यावा. युद्ध पातळीवर आणि अचूक असा डाटा फोन नंबर सहित तयार करायला हवा. प्रभावी योजना आणि योग्य अंमलबजावणी करण्यात यावी अशी मागणी ॲड.संदीप चिंचवडे यांनी केली आहे.






















Join Our Whatsapp Group