पालघर (Pclive7.com):- सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवण येथील राजकोट किल्ल्यावर छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा कोसळला. त्यानंतर आज वाढवण येथे भाषण करताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जाहीर माफी मागितली आहे. पंतप्रधान मोदी म्हणाले, काही दिवसांपूर्वी सिंधुदुर्गमध्ये जे काही घडलं, ते अत्यंत दुख:द आहे. शिवाजी महाराज हे फक्त नाव नाही. ते आमचे आराध्य दैवत आहेत. मी आज नतमस्तक होऊन त्यांची माफी मागतो.
पंतप्रधान नरेंद्र मोदी हे आज महाराष्ट्र दौऱ्यावर होते. पालघरमध्ये वाढवण बंदराचे भूमिपूजन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते झाले. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवण येथील राजकोट किल्ल्यावरील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचं अनावरण त्यांच्याच हस्ते डिसेंबर 2023 मध्ये झालं होतं. दरम्यान, छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळल्यानंतर संपूर्ण महाराष्ट्रात संतापाची लाट उसळली आहे. विरोधकांनी महायुती सरकारवर टीकेची झोड उठवली आहे. त्यानंतर आता थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी माफी मागत या प्रकरणावर पडदा टाकण्याचा प्रयत्न केला आहे.
यापूर्वी शेतकरी कायदे मागे घेतना मोदी यांनी माफी मागितली होती. मात्र ती थेट नव्हती. आम्ही शेतकऱ्यांना समजाऊन सांगण्यात अपयशी ठरलो अशा आशयाचे वक्तव्य करून त्यांनी सदर कायदे चुकीचे असल्याचे थेट मान्य केले नव्हते. यावेळी मात्र छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा पडल्याच्या प्रकरणात त्यांनी थेट माफी मागितली आहे.