प्रख्यात गायक अवधूत गुप्ते यांच्या हस्ते पिंपरी चिंचवड आयडॉल स्पर्धेचे पारितोषिक वितरण संपन्न
पिंपरी (Pclive7.com):- यंदाच्या पिंपरी चिंचवड आयडॉलच्या ९ व्या पर्वाचा ज्युनिअर गटातील करंडक भार्गव जाधव याने तर सिनिअर गटातील करंडक अभिषेक शिंदे या गायकांनी पटकावला. हर्षवर्धन भोईर यांच्या वतीनं आयोजित करण्यात आलेल्या या स्पर्धेचे पारितोषिक वितरण प्रख्यात गायक अवधूत गुप्ते यांच्या हस्ते करण्यात आले.
या दोन्ही गटातील विजेत्यांना प्रत्येकी रोख २१ हजार रुपये आणि करंडक असे पारितोषिक देऊन गौरविण्यात आले. आकुर्डीतील ग. दी. माडगूळकर नाट्यगृहात पार पडलेल्या या स्पर्धेच्या महाअंतिम सोहळ्यास अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेचे शहराध्यक्ष भाऊसाहेब भोईर, माजी नगरसेवक नाना काटे, शत्रुघ्न काटे, प्रशांत शितोळे, संतोष बारणे, राजेंद्र जगताप, श्रीधर वाल्हेकर, राजेंद्र साळुंखे, मानसी घुले, सुनील पवार, राजेंद्र शिंदे, मंजुश्री ओक, हर्षवर्धन भोईर, रोहित नागभिडे, विवेक परांजपे, आर्यक पाठक आदी उपस्थित होते.
या स्पर्धेत तब्बल ३०० स्पर्धकांनी सहभाग घेतला होता. यावेळी बोलताना अवधूत गुप्ते म्हणाले की, आपल्या भागातील चांगले गायक घडवण्यासाठी भाऊसाहेब भोईर आणि हर्षवर्धन भोईर जे सातत्यपूर्ण प्रयत्न करत आहेत, ते निश्चित कौतुकास्पद आहे. असे कार्यक्रम घेण्यासाठी कलाप्रेमी असणं गरजेचं आहे.
या महाअंतिम सोहळ्यात भाऊसाहेब भोईर यांनीही गाणं सादर करत उपस्थितांची मन जिंकली. तर मंजुश्री ओक, विजय आवळे, ज्योती गोराणे, सुग्रीव चव्हाण, विवेक परांजपे, रोहित नागभिडे, स्वरूप काळे, राजेश्वरी पवार, रेश्मी मुखर्जी, चैतन्य अडकर, वैजयंती भालेराव, अरविंद आगरवाल, आरती दीक्षित, अनिल घाडगे, रश्मी मुखर्जी यांनी परीक्षक म्हणून काम पाहिले.