आळंदी (Pclive7.com):- आळंदीत मद्यविक्री, वेश्याव्यवसाय यांसारखे प्रकार वाढल्याच्या तक्रारी येत असून, आळंदीत घडणारे हे प्रकार चिंताजनक आहेत. पोलिसांना आवश्यक ती सर्व मदत देण्यात येत असताना असे प्रकार रोखण्याची जबाबदारी कोणाची आहे, असा सवाल करत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी हे प्रकार बंद न झाल्यास कारवाई करण्याचा इशारा पिंपरी-चिंचवड पोलिसांना दिला.

आळंदीतील विविध विकासकामांचे भूमिपूजन पवार यांच्या हस्ते गुरुवारी झाले. त्या वेळी ते बोलत होते. आमदार दिलीप मोहिते, तहसीलदार ज्योती देवरे, मुख्याधिकारी कैलास केंद्रे, जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षा निर्मला पानसरे या वेळी उपस्थित होते.

मंदिर परिसरात मद्यविक्री, वेश्या व्यवसाय सुरू असल्याची तक्रार काँग्रेस कार्यकर्त्यांनी पवार यांच्याकडे केली होती. या पार्श्वभूमीवर पवार म्हणाले की, श्री संत ज्ञानेश्वर महाराजांसमोर नतमस्तक झाल्याशिवाय आपण पुढे जात नाही. पण, माउलींच्या आळंदीत घडणारे प्रकार चिंताजनक आहेत. पोलिसांना हवे ते दिले जात आहे. पुण्यात सात, तर पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयासाठी चार पोलीस ठाणे मंजूर केले आहेत. त्यामुळे असे व्यवसाय बंद करण्याची जबाबदारी कोणाची आहे? इथे असणाऱ्या अधिकाऱ्यांनी नोंद घ्यावी. हे व्यवसाय बंद झाले नाहीत, तर पोलिसांवर कारवाई केली जाईल. आता सोडणार नाही. कायदा सर्वांना समान आहे. आम्ही कोणताही राजकीय हस्तक्षेप केला नाही, करणारही नाही. पोलिसांनी पोलिसांचे काम करावे असं अजित पवार यांनी म्हटले आहे.
























Join Our Whatsapp Group