पहिल्या चार दिवसांत १० हजाराहून अधिक सायकलस्वारांचे ‘रजिस्ट्रेशन’; अविरत श्रमदान, सायकल मित्र पुणेसह विविध संघटनांचा सहभाग
पिंपरी (Pclive7.com):- इंद्रायणी नदी स्वच्छता अन् संवर्धनाच्या जागृती करणे. पर्यावरण रक्षणाचा संदेश देणे आणि युवा पिढीमध्ये सायकलिंग व नियमित व्यायाम याबाबत जनजागृती करणे. या उद्देशाने आयोजित इंद्रायणी रिव्हर सायक्लोथॉनच्या नोंदणीला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. पहिल्या चार दिवसांतच तब्बल १० हजार २८६ हून अधिक पर्यावरण प्रेमींनी सायकल रॅलीसाठी ऑनलाईन रजिस्ट्रेशन केले आहे.
श्रीक्षेत्र आळंदी आणि श्रीक्षेत्र देहू अशा तीर्थक्षेत्रांना जोडणारी इंद्रायणी नदीबाबत महाराष्ट्रातील वारकरी सांप्रदयामध्ये विषेश महत्त्व आहे. इंद्रायणीचे पाणी तीर्थ म्हणून वारकरी प्राषण करतात. मात्र, नदी प्रदूषणामुळे इंद्रायणीचे अस्थित्व धोक्यात आले आहे. अशा पवित्र इंद्रायणीला गतवैभव प्राप्त करुन देण्यासाठी आमदार महेश लांडगे यांच्या संकल्पनेतून ‘ इंद्रायणी रिव्हर सायक्लोथॉन’ ही मोहीम हाती घेण्यात आली. 2017 पासून प्रतिवर्षी ‘इंद्रायणी रिव्हर सायक्लोथॉन’ आयोजित केली जाते. यंदा सायक्लोथॉचे 9 वे वर्ष आहे, अशी माहिती मुख्य समन्वयक डाॅ. निलेश लोंढे यांनी दिली आहे.
येत्या रविवारी, दि. 19 जानेवारी 2025 रोजी भोसरी येथील गावजत्रा मैदानावर सकाळी 6 वाजता विविध क्षेत्रातील मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये ही सायक्लोथॉन होणार आहे.
‘इंद्रायणी रिव्हर सायक्लोथॉन’मध्ये पर्यावरण प्रेमी, सायकलपटू आणि सर्वसामान्य नागरिकांना सहज सहभागी होता यावे. या करिता आयोजकांनी https://rivercyclothon.in/ हे संकेतस्थळ निर्माण केले आहे. याद्वारे ऑनलाईन पद्धतीने नागरिकांनी सायक्लोथॉनसाठी नोंदणी करता येते. विशेष म्हणजे, सायक्लोथॉनमध्ये सहभागी होण्यासाठी कोणतेही शुल्क आकारले जात नाही. संकेतस्थळ समाजमाध्यमांध्ये व्हायरल करण्यात आले. सोमवारी सायंकाळी 5 वाजेपर्यंत 10 हजार 286 नागरिकांनी यावर नोंदणी केली आहे. त्यामुळे सर्वस्तरातील नागरिकांचा या रॅलीला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे.
गिनिज बूक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डचा मान..
पिंपरी-चिंचवड महानगरपालिका, पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालय यांच्या पुढाकाराने आणि अविरत श्रमदान, सायकल मित्र-पुणे, महेशदादा स्पोर्ट्स फाउंडेशन आणि शिवांजली सखी मंच यांच्यासह विविध पर्यावरण प्रेमी संस्था, संघटना आणि स्वयंसेवीवृत्तीने काम करणारे मान्यवर या ‘रिव्हर सायक्लोथॉन’च्या आयोजनासाठी पुढाकार घेतात. पिंपरी-चिंचवड आणि परिसरातील सुमारे 35 हजार सायकलपटू युवक-युवती आणि अबालवृद्ध सायकल रॅलीमध्ये सहभागी होतात. गतवर्षी रिव्हर सायक्लोथॉनची 2022 मध्ये ‘इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड’ मध्ये नोंद झाली आहे. ‘सायकलची सर्वात मोठी रांग’ (‘Longest line of bicycles (static)’ हे रेकॉर्ड, गिनीस वर्ल्ड रेकॉर्डस् मध्ये नोंदवण्यात आले होते.
Tags: River Cyclothon