पिंपरी (Pclive7.com):- जपान हा जगातील प्रगत देशांपैकी एक देश असून या देशाला खुपदा नैसर्गिक आपत्तीचा सामना करावा लागतो. अशावेळी आपत्ती व्यवस्थापनासाठी तेथे आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून विविध प्रकारच्या आपत्तींवर जलद प्रतिसाद देऊन प्रभावीपणे नियंत्रण मिळवले जाते. भारतातील भौगोलिक रचनेचा विचार करून पिंपरी चिंचवड शहराचा विस्तार आणि औद्योगिक आस्थापनांची संख्या पाहता जपानमधील आपत्ती व्यवस्थापन पद्धतींमध्ये वापरण्यात येणाऱ्या आधुनिक तंत्रज्ञानाचे आदान प्रदान केल्यास पिंपरी चिंचवड शहराच्या आपत्ती व्यवस्थापन कार्यक्षमता अधिक सक्षम होईल, असा विश्वास अतिरिक्त आयुक्त प्रदीप जांभळे पाटील यांनी व्यक्त केला.
पिंपरी चिंचवड महापालिका हद्दीत उद्भवणाऱ्या नैसर्गिक आणि मानवनिर्मित आपत्तींवर जलद तसेच प्रभावीपणे नियंत्रण कसे मिळवावे याबाबत जपानमधील आंतरराष्ट्रीय संबंधांसाठी कार्य करणा-या स्थानिक प्राधिकरण परिषदेच्या सिंगापूर प्रतिनिधी कार्यालयाच्या वतीने महापालिकेच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांना देण्यात येणाऱ्या १३ जानेवारी ते १७ जानेवारी अशा ५ दिवसीय अग्निशमन व आपत्ती प्रतिबंधक प्रशिक्षण सत्राचा प्रारंभ आज झाला. या प्रशिक्षण कार्यशाळेचे उद्घाटन जांभळे पाटील याच्या हस्ते करण्यात आले. त्यावेळी ते बोलत होते.
चिंचवड येथील ऑटो क्लस्टर प्रदर्शन केंद्र या ठिकाणी पार पडलेल्या या कार्यक्रमास औंध कॅम्पच्या ३३० इन्फट्री ब्रिगेडचे कर्नल नितीन रुमाले, एन. डी. आर. एफ चे कमांडंट संतोष सिंह, सिंगापूर येथील जे क्लेर संस्थेचे कार्यकारी संचालक ताकानो, विशेतज्ञ शिओमी, वरिष्ठ उपसंचालक नागता, उपसंचालक सुश्री कोबायाशी, साकामोटो, वरिष्ठ संचालक सीआऊ यांच्यासह महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त चंद्रकांत इंदलकर, शहर अभियंता मकरंद निकम, मुख्य माहिती व तंत्रज्ञान अधिकारी नीलकंठ पोमण, यशवंतराव चव्हाण स्मृती रूग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. राजेंद्र वाबळे, मुख्य अभियंता प्रमोद ओंभासे, संजय कुलकर्णी, सहशहर अभियंता संजय खाबडे, बाबासाहेब गलबले, देवन्ना गट्टूवार, अतिरिक्त आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ. अभयचंद्र दादेवार, उपआयुक्त मनोज लोणकर, राजेश आगळे, मुख्य सुरक्षा अधिकारी उदय जरांडे, मुख्य आपत्ती व्यवस्थापन अधिकारी ओमप्रकाश बहिवाल, विशेष अधिकारी किरण गायकवाड, कार्यकारी अभियंता बापूसाहेब गायकवाड तसेच अग्निशमन विभागासह विविध विभागांचे अधिकारी कर्मचारी उपस्थित होते.
पिंपरी चिंचवड औद्योगिक नगरी दिवसेंदिवस वाढत चालली असून या शहरात उद्धवणा-या आपत्तींवर नियंत्रण मिळविणे हे मोठे आव्हान आहे, असे नमूद करून जांभळे पाटील म्हणाले, जपानी तंत्रज्ञानाची आणि आपत्ती व्यवस्थापन हाताळणीची माहिती प्रशिक्षणाच्या माध्यमातून होत आहे. जपानमधील आपत्ती व्यवस्थापन प्रणाली हे समन्वयाचे एक उत्तम उदाहरण आहे. पिंपरी चिंचवड शहरात उद्भवणाऱ्या आपत्तीला सामोरे जात असताना आपत्ती व्यवस्थापन हे फक्त अग्निशमन विभागाकडील कार्य नसून हे सर्व यंत्रणांनी समन्वयाने परिस्थिती हाताळण्याचे व्यवस्थापन आहे. आपत्ती व्यवस्थापनामध्ये प्रत्येक यंत्रणेची एक महत्वपूर्ण जबाबदारी असते. जपानमधील आधुनिक आपत्ती व्यवस्थापन प्रणालीमधील अत्याधुनिक संकल्पना, प्रतिसाद प्रणाली, प्रारंभिक चेतावणी प्रणाली, तंत्रज्ञानाचा वापर, सामाजिक सहभाग आदी गोष्टींचे अनुकरण केल्यास आपल्याकडे उद्भवणाऱ्या आपत्तींवर जलद तसेच प्रभावीपणे नियंत्रण मिळविण्यात मदत होईल. त्यासाठी हे प्रशिक्षण महत्वाचे ठरणार आहे.
अतिरिक्त आयुक्त चंद्रकांत इंदलकर म्हणाले, जपान हा जगातील सर्वात प्रगत आपत्ती व्यवस्थापन यंत्रणा असलेला देश असून त्यांच्या दीर्घ अनुभवातून शिकण्याची ही सुसंधी आहे. पिंपरी चिंचवड शहरात दिवसेंदिवस वाढत असलेल्या गृहप्रकल्पासह औद्योगिक आस्थापनांमुळे आपत्ती व्यवस्थापनासमोरील आव्हान वाढत असून त्याचा सामना करण्यासाठी आवश्यक ज्ञान या प्रशिक्षणाच्या माध्यमातून मिळणार आहे. आपत्ती येण्यापूर्वी, आपत्ती काळात आणि आपत्तीनंतर करण्यात येणारे व्यवस्थापन महत्त्वपूर्ण असते. अशावेळी जीवित तसेच वित्त हानी टाळण्याची दक्षता घेणे गरजेचे असते. या पार्श्वभूमीवर प्रशिक्षणाच्या माध्यमातून जपानी तज्ञांच्या मार्गदर्शनाखाली महापालिका हद्दीतील आपत्ती प्रवण क्षेत्रपाहणी करून संभाव्य आपत्कालीन परिस्थिती हाताळण्यासाठी सर्वंकष आराखडा तयार करून नियोजन करण्याचा महापालिकेचा कृतीशील प्रयत्न असेल.
जपानच्या सिंगापूर येथील जे क्लेर संस्थेचे विशेषज्ञ शिआमि आणि कार्यकारी संचालक ताकानो म्हणाले, आतापर्यंत आम्ही विविध प्रकारच्या आपत्तींचे व्यवस्थापन केले आहे. मात्र आम्ही पहिल्यांदाच भारतात आलो आहोत. आपत्कालीन परिस्थिती हाताळत असताना विविध प्रकारची आव्हाने असतात त्यावर मात करून आपत्तीचे यशस्वीरित्या व्यवस्थापन करत असतो. जपानमधील तंत्रज्ञान आणि आपत्ती व्यवस्थापन हाताळण्याची पद्धत याबद्दल माहितीचे आदान प्रदान करण्यासाठी पिंपरी चिंचवड महापालिकेने आयोजित केलेले प्रशिक्षण निश्चितपणे उपयुक्त ठरेल, असा विश्वास आहे.
कर्नल नितीन रुमाले म्हणाले, आपत्तीला पूर्ण तयारीनिशी सामोरे जाणे गरजेचे आहे. आपत्ती काळात शिस्त आणि वेळेला खूप महत्त्व असून जीवित व वित्त हानी टाळण्यासाठी प्राधान्य देणे अनिवार्य असते. कोणी, कुठे, कधी, काय करावे हे निश्चित केल्यास आपत्तीचे योग्य प्रकारे व्यवस्थापन करता येते. लष्कराला आपत्ती निवारणासाठी पाचारण केले जाते. आपत्तीला सामोरे जाऊन परिस्थिती हाताळण्याचे कौशल्य आणि जागरूकता सामान्य नागरिकांमध्ये देखील निर्माण झाली पाहिजे.
कमांडंट संतोष सिंह म्हणाले, जपानमध्ये अत्याधुनिक भूकंप आणि त्सुनामी चेतावणी प्रणाली आहे. जपान मध्ये नागरिकांना आपत्तीच्या वेळी काय करावे यासाठी वेळोवेळी प्रशिक्षण दिले जाते. तसेच मॉक ड्रील देखील घेतले जातात. आपत्ती नंतर काळात विविध आव्हानांना सामोरे जात असताना स्थानिक समुदायाला कशा प्रकारे सहभागी करून घ्यावे याचे उत्तम उदाहरण जपान आहे. भारतात अशा पद्धतीने प्रशिक्षण कार्यक्रम आयोजित करणे गरजेचे असल्याचे त्यांनी सांगितले. नैसर्गिक आपत्तीसह सायबर हल्ल्यासारख्या मानवनिर्मित आपत्तीचा प्रतिकार करण्याची जबाबदारी सामुहिक असून सर्व यंत्रणाचे संयुक्तिक प्रशिक्षण आपत्ती व्यवस्थापन हाताळण्यासाठी महत्वाचे ठरणार आहे.
दरम्यान, पिंपरी चिंचवड महापालिका क्षेत्रात अग्निशमन व आपत्ती व्यवस्थापन विषयक कामकाजाचे उप आयुक्त मनोज लोणकर, मुख्य आपत्ती व्यवस्थापन अधिकारी ओमप्रकाश बहिवाल यांनी संगणकीय सादरीकरणाद्वारे माहिती दिली. जपान प्रशिक्षकांनी महापालिका क्षेत्रातील आपत्तीप्रवण स्थळ पाहणी देखील केली.