चिखली (Pclive7.com):- अफाट संपत्ती कमविण्यापेक्षा संस्कारित संतती घडवा. सुसंस्कारित संतती हीच खरी संपत्ती आहे. मुलांना रील्स स्टार बनवायचे कि रियल स्टार याचे चिंतन रील्स बघणाऱ्या पालकांनी करण्याची आज गरज आहे असे मत व्याख्याते यशवंत गोसावी यांनी व्यक्त केले.
चिखली शरद नगर येथील स्वामी विवेकानंद लोकसेवा प्रतिष्ठानच्या वतीने स्वामी विवेकानंद जयंतीनिमित्त आयोजित करण्यात आलेल्या व्याख्यानमालेत “उंच भरारी घेणाऱ्याला आकाशाची तमा नसते” या विषयावर ते बोलत होते. यावेळी शिक्षण मंडळ माजी उपसभापती विष्णू नेवाळे, सचिन सानप, अजय पाताडे,स्वामी विवेकानंद प्रतिष्ठानचे अध्यक्ष रामराजे बेंबडे आदी मान्यवर उपस्थित होते.
यशवंत गोसावी पुढे म्हणाले कि, आयुष्यात भले ही काही मोठे होता आले नाही तरी चालेल पण एक उत्तम नागरिक बना. केवळ वयाने मोठे होऊन चालणार नाही तर कर्तृत्वाने मोठे व्हावे लागेल. यासाठी पालकांनी मुलांच्या पंखामध्ये संस्काराचे बळ भरावे लागेल. यासाठी आई वडिलांनी जबाबदारी घेतली पाहिजेत. कर्णबधिर असणाऱ्या मुलाला एका शाळेने प्रवेश नाकारला. आईने घरी शिक्षण देवून त्याला जागातील पातळीवरचा शास्त्रज्ञ बनवले आज सर्वाधिक पेंटन्ट नावावर असलेले बल्बचा शोध लावणारे थॉमस एडिसन यांचे उदाहरण दिले. जिल्हाधिकारी बनलेले तमासगिरीचा मुलगा अमित काळे यांच्या बालपणीचा किस्सा कथन केला. यासाठी आजच्या आईला जिजाऊ, रमाई, सावित्री व्हावी लागेल. आज मालिकांमध्ये हरवलेलीई आई शोधण्याची गरज आहे. पद्मश्री श्रीनाथ खंडेलवाल यांना देखील वृद्धाश्रमात राहायची वेळ आली. अंतिम संस्काराला मुले हजर राहिली नाहीत तेव्हा संस्कार द्यायला ते विसरले असतील अशी खंत त्यांनी व्यक्त केली.
आई वडील नसलेली मुले गुन्हेगारीकडे वळतात. आज जातीय दरी कमी पण आर्थिक दरी मोठ्या प्रमाणावर निर्माण होत आहे. ही आर्थिक दरी वाढत गेल्यास भविष्यात स्थिती भयावह होईल. मुले घडविताना राष्ट्रपुरुषांचे विचार त्यांच्यावर बिंबवा. त्यांना मनाने अपंग बनवू नका असा सल्ला शेवटी त्यांनी दिला.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संतोष ठाकूर यांनी तर आभार महेश मांडवकर यांनी मानले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी गिरीश चौधरी, महेंद्र माकोडे, हनुमंत शिंदे, बाळकृष्ण अंबुलकर, आर के पाटील, पंकज ओझरकर यांनी विशेष परिश्रम घेतले.