शिर्डी (Pclive7.com):- भारतीय जनता पक्षाच्या महाअधिवेशनात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आगामी महापालिकेच्या निवडणुकीबाबत महत्त्वपूर्ण विधान केलं आहे. शिर्डीत पार पडलेल्या या अधिवेशनाला भाजपाचे प्रमुख नेते, कार्यकर्ते आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह उपस्थित होते. या अधिवेशनात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांवर चर्चा करण्यात आली, ज्यामुळे या निवडणुकांसाठीचा भाजपाचा आत्मविश्वास आणि तयारी दिसून आली.
फडणवीस म्हणाले, “सर्वोच्च न्यायालयातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांबाबतचा निर्णय शेवटच्या टप्प्यात आहे. हा निर्णय झाला, तर पुढील तीन-चार महिन्यांत निवडणुका होऊ शकतात. या निवडणुकांमध्ये महायुतीला विधानसभेप्रमाणेच यश मिळवायचं आहे, आणि त्यासाठी आपल्याला सज्ज व्हावं लागेल.”
फडणवीसांनी भाजपाच्या यशामागील कारणं सांगताना विकासाची कामं, पारदर्शक कारभार, आणि प्रामाणिकतेचा उल्लेख केला. “भाजपाला मिळालेलं यश जनतेच्या विश्वासाचं प्रतिक आहे. त्यामुळेच स्थानिक पातळीवरही विकासाच्या जोरावर विजय मिळवण्याचा आमचा निर्धार आहे,” असं ते म्हणाले.
फडणवीस यांनी भाजपाच्या यशावर प्रकाश टाकताना विधानसभेतील परफॉर्मन्सचा उल्लेख केला. त्यांनी सांगितलं की, “महाराष्ट्रात गेल्या ३० वर्षांत तीनदा १०० पेक्षा जास्त जागा मिळवणारा भाजप हा एकमेव पक्ष आहे. विधानसभेत आम्ही ८२ टक्के गुण मिळवले, तर भाजपाने ८९ टक्के गुण मिळवत स्पष्ट विजय मिळवला.”
महापालिका आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांना सामोरं जाण्यासाठी भाजपाने यापासून तयारी सुरू केली आहे. कार्यकर्त्यांना प्रोत्साहित करताना फडणवीसांनी सांगितलं की, विधानसभेतील यश स्थानिक निवडणुकांमध्येही परावर्तित करायचं आहे.
महाअधिवेशनाद्वारे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये भाजपाच्या ताकदीला अधिक बळ देण्याचा निर्णय झाला. विकास, पारदर्शकता, आणि जनसामान्यांच्या जीवनात परिवर्तन घडवण्यासाठी भाजपाची कटिबद्धता पुन्हा अधोरेखित करण्यात आली.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वक्तव्याने आगामी निवडणुकींच्या संदर्भात भाजपाने रणशिंग फुंकलं आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लवकरच होण्याची शक्यता आहे, आणि भाजपाने या निवडणुकांसाठी स्वतःला पूर्णपणे तयार करण्याचा निर्धार व्यक्त केला आहे.