पीसीईटी, पीसीयू, गर्जे मराठी ग्लोबल, एमईडीसीच्या परिषदेचे उद्घाटन
पिंपरी (Pclive7.com):- अमेरिकेसारख्या विकसित राष्ट्रांमध्ये मराठी उद्योजक मोठ्या पदांवर जबाबदारी सांभाळत आहेत. महाराष्ट्रात नैसर्गिक साधन संपत्ती मुबलक प्रमाणात उपलब्ध आहे. महाराष्ट्र बरोबरच देशभर उद्योग, व्यवसाय आणि रोजगाराला चालना देण्यासाठी सरकारी संस्था, शैक्षणिक संस्था आणि उद्योजक यांच्यामध्ये योग्य समन्वय, संपर्क होणे आवश्यक आहे. त्यासाठी पीसीईटी, पीसीयू, गर्जे मराठी ग्लोबल आणि एमईडीसी यांनी स्थापन केलेले ‘ग्लोबल एंटरप्रेन्युअर्स कॉन्क्लेव्ह २०२५’ हे व्यासपीठ मार्गदर्शक ठरेल. या व्यासपीठामुळे महाराष्ट्र सह जगभरातील मराठी उद्योजकतेला चालना मिळेल असे प्रतिपादन केंद्रीय रस्ते व महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी केले.
पिंपरी चिंचवड एज्युकेशन ट्रस्ट (पीसीईटी) संचलित पिंपरी चिंचवड विद्यापीठ (पीसीयु), गर्जे मराठी ग्लोबल, महाराष्ट्र इकॉनॉमिक डेव्हलपमेंट कौन्सिल यांच्या संयुक्त विद्यमाने, बालेवाडी येथे ‘ग्लोबल एंटरप्रेन्युअर्स कॉन्क्लेव्ह २०२५’ चे आयोजन करण्यात आले होते. त्याचे उद्घाटन नितीन गडकरी यांच्या हस्ते ऑनलाईन पद्धतीने करण्यात आले. यावेळी उद्योग मंत्री उदय सामंत, माजी मंत्री व पीसीयूचे कुलगुरू हर्षवर्धन पाटील, जीआरएचे अध्यक्ष आणि नॅशनल इनोव्हेशन फाऊंडेशन, इंडियाचे अध्यक्ष डॉ. रघुनाथ माशेलकर, स्ट्रॅटेजिक फोरसाइट ग्रुपचे अध्यक्ष आणि ए वर्ल्ड विदाऊट वॉरचे लेखक संदीप वासलेकर, डॉ. समीर मित्रगोत्री, हार्वर्ड विद्यापीठाचे प्रा. डॉ. नील फिलिप, ब्रॉन्क्स कम्युनिटी कॉलेज न्यूयॉर्कच्या सिटी युनिव्हर्सिटीचे प्रा. डॉ. मुकुंद कर्वे, रटगर्स विद्यापीठ यूएसएचे प्रा. आणि डॉ. शैलेंद्र देवळाणकर, पीसीईटीच्या उपाध्यक्ष पद्माताई भोसले खजिनदार शांताराम गराडे, उद्योजक नरेंद्र लांडगे,
अजिंक्य काळभोर, कार्यकारी संचालक डॉ. गिरीश देसाई तसेच महाराष्ट्र शासनाचे उच्च शिक्षण संचालक, उद्योग मंत्रालयाचे उच्चपदस्थ अधिकारी, देश, परदेशातून आलेले मराठी उद्योजक उपस्थित होते.
यावेळी उद्योग मंत्री उदय सामंत यांच्या हस्ते उद्योजक रामदास काकडे, डॉ. पी. डी. पाटील आणि सुरेश पुराणिक यांना जीवनगौरव तसेच आशिष आचलेकर, अमित गर्ग, डॉ. एस. व्ही. आंचन, रमेश रासकर, महेश भागवत, विलास शिंदे यांना विशेष पुरस्कार देऊन गौरविण्यात आले.
उद्योग मंत्री उदय सामंत उद्घाटन सत्रात मार्गदर्शन करताना म्हणाले की, महाराष्ट्र बरोबरच देश परदेशातील मराठी उद्योजकांना उद्योग व्यवसाय मध्ये मदत होण्यासाठी महाराष्ट्र उद्योग मंत्रालयाच्या वतीने एक स्वतंत्र विभाग निर्माण करण्यात येणार आहे.
आकुर्डी येथील पिंपरी चिंचवड अभियांत्रिकी महाविद्यालयात मराठी भाषेत अभियांत्रिकीचे अभ्यासक्रम सुरू करण्यात आले आहेत. याचा आगामी काळात मराठी अभियंते मोठ्या प्रमाणात घडण्यास उपयोग होईल.
माजी मंत्री व पीसीयूचे कुलगुरू हर्षवर्धन पाटील यांनी सांगितले की, शैक्षणिक संस्था व विविध उद्योग यांच्यातील यांच्यातील अंतर कमी करण्यासाठी हे व्यासपीठ सुरू करण्यात आले आहे. यामध्ये उद्योजक, विद्यार्थी व उद्योग विभागाचे धोरण ठरवणारे अधिकारी यांना एकत्र आणून यावर मार्ग काढण्याचा प्रयत्न पीसीयूच्या माध्यमातून करण्यात येणार आहे.
या परिषदेसाठी शंभर पेक्षा जास्त एनआरआय मराठी उद्योजक, वक्ते, संशोधक, शास्त्रज्ञ, १२० स्टार्टअपचे नवउद्योजक, गुंतवणूकदार अशा बाराशे पेक्षा जास्त व्यक्तींनी सहभाग घेतला होता.
पिंपरी चिंचवड एज्युकेशन ट्रस्टचे अध्यक्ष ज्ञानेश्वर लांडगे, उपाध्यक्षा पद्मा भोसले, सचिव विठ्ठल काळभोर, खजिनदार शांताराम गराडे, विश्वस्त तथा पीसीयुचे कुलपती हर्षवर्धन पाटील, उद्योजक नरेंद्र लांडगे, अजिंक्य काळभोर, कार्यकारी संचालक डॉ. गिरीश देसाई यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. स्वागत सचिन ईटकर, आभार आनंद गानु यांनी मानले.