पिंपरी (Pclive7.com):- पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचा मालमत्ता कर न भरल्याने जप्त करण्यात आलेली सरस्वती इंग्लिश मीडियम हायस्कूल अँड कॉलेज, पवारवस्ती, कुदळवाडी, चिखली या मालमत्तेचे सील तोडून आतमध्ये प्रवेश केल्याप्रकरणी सुरेश विठ्ठल जाधव (रा.चिखली, पिंपरी-चिंचवड, पुणे) यांच्यावर मागील आठवड्यात (७ जानेवारी २०२५) चिखली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी करसंकलन विभागाच्या चिखली विभागीय कार्यालयातील सहाय्यक मंडलाधिकारी बाळु रामचंद्र लोंढे यांनी फिर्याद दिली होती. त्यानुसार भारतीय न्याय संहिता २०२३ कलम ३२९ (३) नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पिंपरी चिंचवड महानगपालिकेच्या करसंकलन विभागाच्या वतीने मालमत्ता कर वसुलीसाठी विविध मोहीम राबवल्या जातात. मालमत्ताधारकांना कर भरण्याचे वारंवार आवाहन करण्यात येते. वेळप्रसंगी नोटीस देण्यात येते. मात्र, त्यानंतरही मालमत्ता कर न भरल्यास मालमत्ता जप्त करून ती सील करण्यात येते. पण जप्त केलेल्या मालमत्तेच सील कर न भरता अनाधिकृतपणे तोडून मालमत्तेत प्रवेश केल्याचा प्रकार चिखलीत घडला आहे.
चिखली कर संकलन विभागीय कार्यालयाच्या अंतर्गत गट क्र. ७९४ पवारवस्ती, कुदळवाडी येथे सरस्वती इंग्लिश मीडियम हायस्कूल अँड कॉलेज आहे. ही मालमत्ता मालमत्ताधारक सुरेश विठ्ठल जाधव यांची आहे. या मालमत्तेची कर थकबाकी बिलाची रक्कम व चालू वर्षाची मालमत्ता कराची रक्कम आणि लागलेल्या दंडाची रक्कम अशी एकूण २४,५९,८३८ रुपये तर, अवैध बांधकाम शास्ती कर रुपये ३०,८९,२२६ रुपये अशी एकूण रक्कम ५५,४९,०६४ रुपये येणे बाकी आहे. त्यापैकी अवैध बांधकाम शास्ती कर वगळून २४,५९,८३८ रुपये एवढा मालमत्ता कर भरल्यास अवैध बांधकाम शास्ती कर रुपये ३०,८९,२२६ रुपये माफ होणार आहे. मालमत्ता कर थकबाकी भरण्याबाबत वारंवार मालमत्ताधारक सुरेश विठ्ठल जाधव यांना कळविण्यात आले होते. परंतु त्यांनी त्यास टाळाटाळ केल्याने अखेर ३१ डिसेंबर २०२४ रोजी चिखली कर संकलन कार्यालयाने सदर मालमत्ता जप्त करून सील केली होती.
मागील आठवड्यात जप्तीची कारवाई करतेवेळी मालमत्ताधारक सुरेश जाधव यांनी पाच लाख रुपये भरतो, असे सांगितले. परंतु किमान ५० टक्के रक्कम ताबडतोब भरावे व उर्वरित ५०% रक्कमेचे पोस्ट डेटेड धनादेश द्यावेत अशा संबंधितांना सूचना दिल्या, परंतु त्यांची मालमत्ता कर भरण्याची मानसिकता नसल्याने त्यांनी मालमत्ता कर भरला नाही. त्यामुळे त्यांच्या मालमत्तेवर जप्तीची कारवाई करण्यात आली आहे.
सील तोडून मालमत्तेत केला प्रवेश
करसंकलन विभागाने जप्त केलेल्या सरस्वती इंग्लिश मिडीयम हायस्कूल अँड कॉलेज या मालमत्तेत सुरेश विठ्ठल जाधव यांनी सील तोडुन ४ जानेवारी २०२५ रोजी प्रवेश केला. तसेच तेथील तोडण्यात आलेले नळ कनेक्शन ही अनाधिकृतपणे सुरू केले. अखेर याबाबत कर संकलन विभागाने मागील आठवड्यात ७ जानेवारी २०२५ रोजी गुन्हा दाखल केला आहे.
पिंपरी चिंचवड कर संकलन विभागाने थकबाकी असणारा मालमत्ता कर आकारणीसाठी मोहीम हाती घेतली आहे. ज्या मालमत्ताधारकांकडे मोठ्या प्रमाणात थकबाकी आहे, व त्यांना वारंवार नोटीस देऊनही ते थकबाकी भरत नसतील, तर अशा मालमत्ता जप्त करून सील करण्यात येत आहे. जप्त केलेल्या मालमत्तांचे सील तोडल्यास संबंधित व्यक्तीवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.– अविनाश शिंदे,सहाय्यक आयुक्त,करसंकलन विभाग,पिंपरी चिंचवड महानगरपालिका