पुणे (Pclive7.com):- डिलिव्हरी बाॅयच्या वेशात सोसायटीतील बंद सदनिकांची पाहणी करुन घरफोडी करणाऱ्या चोरट्याला स्वारगेट पोलिसांनी अटक केली. याप्रकरणात चोरट्याचा साथीदार सराईत गुंड, तसेच सराफ व्यावसायिकाला अटक करण्यात आली असून, चोरट्याकडून ८६० ग्रॅम सोन्याचे दागिने, साडेतीन किलो चांदी, १५० हिरे, दुचाकी, दोन पिस्तुलांसह पाच काडतुसे असा ८० लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
याप्रकरणी गणेश मारुती काठेवाडे (वय ३७, रा. मुखेड, जि. नांदेड, सुरेश बबन पवार (वय ३५, रा. बालाजीनगर, धनकवडी, पुणे-सातारा रस्ता), सराफ व्यावसायिक भीमसिंग उर्फ अजय करणसिंग राजपूत (नथवाला) (वय ३९) यांना अटक करण्यात आली आहे, अशी माहिती परिमंडळ दोनच्या पोलीस उपायुक्त स्मार्तना पाटील यांनी पत्रकार परिषदेत दिली. सहायक आयुक्त राहुल आवारे यावेळी उपस्थित होते. स्वारगेट परिसरात गेल्या महिन्यात १९ डिसेंबर रोजी घरफोडी झाली होती.
या गुन्ह्याचा तपास स्वारगेट पोलिसांच्या तपास पथकाकडून करण्यात येत होता. पोलिसांनी जवळपास १६०० ते १७०० सीसीटीव्ही कॅमेऱ्यांनी केलेले चित्रीकरण तपासले होते. तपासात एके ठिकाणी चित्रीकरणा गणेश काठेवाडे याची अस्पष्ट छबी आढळून आली होती. तपास पथकातील पोलीस कर्मचारी रफीक नदाफ, शंकर संपत्ते, सागर केकाण, दिनेश भांदुर्गे यांना स्वारगेट भागतील घरफोडी सराईत चोरटा काठेवाडेने केल्याची माहिती मिळाली.
त्यानंतर पोलिसांच्या पथकाने त्याचा माग काढण्यास सुरुवात केली. कोंढवा परिसरातील उंड्री भागातून त्याला ताब्यात घेण्यात आले. चौकशीत त्याने डिलिव्हरी बाॅयसारखी वेशभूषा करुन शहरातील विविध सोसायटीतील बंद सदनिकांची पाहणी करुन घरफोडीचे १४ गुन्हे केल्याची माहिती मिळाली. त्याने स्वारगेट एसटी स्थानकात परिसरात प्रवाशांकडील ऐवज चोरीचे सात गुन्हे केल्याची माहिती तपासात निष्पन्न झाली. चोरलेले दागिने त्याने सराइत गुन्हेगार सुरेश पवार याच्याकडे दिले होते. पवार याच्याविरुद्ध पोलिसांनी महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायद्यान्वये (मोक्का) कारवाई केली होती. या गुन्ह्यात त्याने जामीन मिळवला होता. काठेवाडे दिलेले दागिने पवारने सराफ व्यावसायिक भीमसिंग राजपूत याच्या मध्यस्थीने विक्री केल्याची माहिती तपासात मिळाली. त्यानंतर पोलिसांनी राजपूतला अटक केली. आरोपी पवार हा मुळशी तालुक्यातील अंबडवेट गावचा माजी उपसरपंच आहे. त्याच्याविरुद्ध खून, खुनाचा प्रयत्न असे गंभीर गुन्हे दाखल झाले आहेत. पोलिसांनी पवार याच्याकडून दोन पिस्तूल, पाच काडतुसे जप्त केली.
स्वारगेट पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक युवराज नांद्रे यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक निरीक्षक राहुल कोलंबीकर, उपनिरीक्षक रवींद्र कस्पटे, संजय भापकर, श्रीधर पाटील, कुंदन शिंदे, नाना भांदुर्गे, सुधीर इंगळे, सचिन तनपुरे, शंकर संपत्ते, सागर केकाण, सतीश कुंभार, राहुल तांबे, शरद गोरे, विक्रमल सावंत, तसेच पोलीस मित्र दिनेश परिहार यांनी ही कामगिरी केली.