चिंचवड (Pclive7.com):- पाच एकर शेतजमीन विकून जुगारात हरला. त्यानंतर पुन्हा जुगार खेळून हरलेली रक्कम परत मिळवण्यासाठी त्याने आणखी जुगार खेळण्यास सुरुवात केली. तिथे पैसे कमी पडू लागले म्हणून त्याने चक्क सख्ख्या बहिणीच्याच घरी चोरी केली. बहिणीच्या घरातून साडेबारा तोळे सोने प्लॅन करून चोरून नेले. तो एवढ्यावरच थांबला नाही तर बहिणीसोबत पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यासाठी देखील गेला. पोलिसांना संशय आल्यानंतर पोलिसांनी चोरी करणाऱ्या भावाला अटक केली. श्रीकांत दशरथ पांगरे (वय २९, रा. बीड) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे.
पोलीस उपायुक्त संदीप डोईफोडे यांनी दिलेल्या माहितीनुसार, १३ जानेवारी रोजी वाल्हेकरवाडी येथील एका सोसायटी मधून भर दिवसा साडेबारा तोळे सोन्याचे दागिने चोरीला गेल्याचा गुन्हा चिंचवड पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आला होता. या गुन्ह्याचा समांतर तपास गुन्हे शाखेकडून केला गेला. यातील फिर्यादी महिला मेडिकल दुकान चालवीत असून त्यांचे पती नोकरीसाठी दिवसभर बाहेर असतात.
त्यांच्याकडे मागील चार महिन्यांपासून त्यांचा भाऊ राहण्यासाठी आला होता. तो डिलिव्हरी बॉय म्हणून काम करत होता. घरात कोणतीही तोडफोड झाली नसल्याने ही चोरी घरातीलच सदस्याने केल्याचा संशय पोलिसांना आला. पोलिसांनी श्रीकांत पांगरे याच्याबद्दल माहिती घेतली. श्रीकांत याला जुगार खेळण्याची सवय आहे. त्याने गावाकडील पाच एकर शेत जमीन विकून त्यातून मिळालेले पैसे जुगारात गमावले होते.
त्यानंतर जुगारात हरलेली रक्कम पुन्हा ऑनलाईन जुगार खेळून लोकांची उधारी देण्यासाठी तो पुण्यामध्ये आला. त्याने १३ जानेवारी रोजी घराचा मागील दरवाजा कोणाच्या लक्षात येणार नाही अशा पद्धतीने उघडा ठेवला. त्यानंतर दुपारी घरी कोणी नसताना दरवाजातून आत येत घरातून त्याने साडेबारा तोळे वजनाचे दागिने चोरले. चोरी करून तो गावी जाण्याच्या तयारीत असतानाच त्याला पोलिसांनी अटक केली.
सदरची कारवाई पिंपरी चिंचवडचे पोलीस आयुक्त विनय कुमार चौबे, सह पोलीस आयुक्त शशिकांत महावरकर, अप्पर पोलीस आयुक्त वसंत परदेशी, पोलीस उप आयुक्त गुन्हे संदिप डोईफोडे, सहाय्यक पोलीस आयुक्त गुन्हे विशाल हिरे यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखा युनिट २ चे प्रभारी अधिकारी वरीष्ठ पोलीस निरीक्षक शैलेश गायकवाड, पोलीस उप निरीक्षक गणेश माने, सहायक पोलीस उपनिरीक्षक प्रमोद वेताळ, पोलीस हवालदार जयवंत राऊत, देवा राऊत, आतिष कुडके यांनी केली आहे.