पिंपरी (Pclive7.com):- आकुर्डी प्राधिकरण येथील डॉ. हेडगेवार भवनजवळ अग्निशमन केंद्र उभारणे तसेच मधुबन हॉटेल ते इंदिरा रोड (२४ मीटर डी.पी रस्ता) व सिल्वर स्पून हॉटेल ते इंदिरा रोड (१८ मीटर डी.पी रस्ता) तसेच या दोन्ही रस्त्यांना जोडणाऱ्या वाकड शिवेपर्यंतचा १८ मीटर रुंदीच्या रस्त्याचे काँक्रीटीकरण करणे अशा विविध विषयांना प्रशासक शेखर सिंह यांनी आज झालेल्या स्थायी समितीच्या बैठकीत मान्यता दिली.
स्थायी समिती आणि महापालिका सभेची मान्यता आवश्यक असलेले विषय प्रशासक शेखर सिंह यांच्या मान्यतेसाठी आज झालेल्या बैठकीत ठेवण्यात आले होते. पिंपरी येथील महानगरपालिकेच्या मुख्य प्रशासकीय इमारतीत पार पडलेल्या या बैठकीस अतिरिक्त आयुक्त विजयकुमार खोराटे, चंद्रकांत इंदलकर यांच्यासह सर्व विभागांचे प्रमुख तसेच संबंधित अधिकारी उपस्थित होते.
शहरातील सार्वजनिक सुरक्षितता सुनिश्चित करणे तसेच जीव आणि मालमत्तेचे रक्षण करण्यासाठी पुरेशा अग्निसुरक्षा सेवेची उपलब्धता सुनिश्चित करण्यासाठी आकुर्डी येथील हेडगेवार भवनजवळ अग्निशमन केंद्र उभारण्यात येणार आहे. या कामासाठी ३० कोटी ६४ लाख रुपये इतकी निविदा रक्कम निश्चित करण्यात आली असून कामाची मुदत १८ महिने इतकी आहे. या इमारतीमध्ये १० मजले असून एकूण ६ अग्निशमन बंबाची व्यवस्था करण्यात येणार आहे. आगीच्या घटनांमध्ये होणाऱ्या जिवीत व वित्त हानीला रोखण्यासाठी तसेच या आपत्कालीन परिस्थितीला तत्परतेने सामोरे जाण्यासाठी हे केंद्र महत्वाचे ठरणार आहे. या अग्निशमन केंद्राच्या उभारणीस येणाऱ्या खर्चास प्रशासक शेखर सिंह यांनी आज झालेल्या स्थायी समिती सभेमध्ये मान्यता दिली.
मधुबन हॉटेल ते इंदिरा रोड या २४ मीटर रूंद आणि १४२० मीटर लांबी असलेल्या तसेच सिल्वर स्पून हॉटेल ते इंदिरा रोड या १८ मीटर रुंद आणि ११२० मीटर लांबीच्या रस्त्याचे तसेच या दोन्ही रस्त्यांना जोडणाऱ्या वाकड शिवेपर्यंतच्या १८ मीटर रस्त्याचे काँक्रीटीकरण करण्यात येणार आहे. या कामासाठी ५८ कोटी ४५ लाख रुपये इतका खर्च होणार असून या कामाची मुदत ३० महिने आहे. या प्रकल्पाअंतर्गत सुरक्षित पदपथ, सुनियोजित पार्किंग, पावसाळी पाण्याचा योग्य निचरा करण्यासाठी नियोजन करण्यात आले आहे. याशिवाय रस्ता दुभाजक आणि सायकल ट्रॅक देखील तयार केले जाणार आहे. यामुळे आरामदायी प्रवास व दळणवळणास मदत मिळणार असून वाहतुक कोंडी कमी होऊन नागरिकांच्या इंधनाची बचत होण्यास मदत मिळणार आहे. या प्रकल्पास येणाऱ्या खर्चास प्रशासक शेखर सिंह यांनी आज झालेल्या स्थायी समिती सभेत मंजुरी दिली.
याशिवाय जान्हवी महिला बचत गट, शुभश्री महिला बचत गट, सावित्रीबाई फुले स्वयंसहायता महिला बचत गट, कमलाई स्वयंसहायता महिला बचत गट, आशिर्वाद स्वयंसहायता महिला बचत गट, महर्षी वाल्मिकी महिला बचत गट, मे. लोकसेवा स्वयंसहायता महिला बचत गट, ऐश्वर्या महिला बचत गट यांना सामुदायिक व सार्वजनिक शौचालयांचे स्वच्छता व देखभाल दुरूस्तीचे काम देणे, महापालिकेच्या प्रभाग क्र. ११, १३, सँडविक कॉलनी व उर्वरित परिसर, कासारवाडी मैलाशुद्धीकरण केंद्राअंतर्गत येणाऱ्या दिघी, बोपखेल, निगडी गावठाण, निगडी प्राधिकरण, गंगानगर, आकुर्डी आदी ठिकाणी आवश्यकतेनुसार ठिकठिकाणी जलनि:सारण व्यवस्थेत सुधारणा करणे व नव्याने विकसित करणे, प्रभाग क्र. ८ मधील सेक्टर नं. ७,१०,११,१३, प्रभाग क्र. ६ मधील चक्रपाणी वसाहत, देवकर वस्ती परिसरात, प्रभाग क्र. १ मधील शेलारवस्ती, पाटीलनगर परिसरात तसेच प्रभाग क्र. २८ मधील पिंपळे सौदागर, रहाटणी, प्रभाग क्र. २५ मधील पुणे-बेंगलोर हायवेलगतच्या ताथवडे, पुनावळे, वाकड भागातील नव्याने ताब्यात आलेले रस्ते आदी भागातील रस्त्यांचे हॉटमिक्स पद्धतीने डांबरीकरण करणे तसेच प्रभाग क्र.१ चिखली अंगणवाडी रोड ते नालापर्यंत, प्रभाग क्र. १६ मधील साईनगर मामुर्डी, प्रभाग क्र. ११ मधील कुदळवाडी-पवारवस्ती या भागात स्टाँर्म वॉटर लाईन टाकणे व अनुषंगिक कामे करणे, प्रभाग क्र. ११ मधील नेवळेवस्ती परिसरातील रस्त्यांचे खडीमुरूमीकरण व डांबरीकरण करणे, प्रभाग क्र.२८ पिंपळे सौदागर रहाटणी येथील रस्त्यांची क्रॉक्रीटीकरणाची कामे करणे आदी विषयांना देखील प्रशासक सिंह यांनी मान्यता दिली.