पिंपरी (Pclive7.com):- पिंपरी चिंचवड शहरात बुलेटराजांना चांगलाच धडा शिकवला आहे. बुलेटच्या सायलेन्सरमधून कर्णकर्कश आवाज काढणाऱ्यांच्या कानाखाली मनसेने आवाज काढला आहे. मनसे शहराध्यक्ष सचिन चिखले यांनी काही तरुणांना फटकारल्याचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला असून सर्व सामान्यांमधून याचे कौतुक होत आहे.
पिंपरी चिंचवड शहरात बुलेटराजांनी हैदोस माजवला आहे. या रोडरोमिओंचा उच्छाद काही केल्या कमी होत नाहीये. मग शेवटी मनसेचे शहराध्यक्ष सचिन चिखले आणि समर्थकांनी या बुलेटराजांना धडा शिकवायचं ठरवलं आहे. महाविद्यालयीन परिसरात बुलेटचे फटाके फोडणाऱ्यांना पकडून त्यांच्या कानाखाली आवाज त्यांनी काढला आहे. यावेळी त्यांच्या सोबत माजी नगरसेवक उत्तम केंदळे, सामाजिक कार्यकर्ते बापू घोलप, माऊली गवळी हे देखील उपस्थित होते.
या बुलेटराजांची मस्ती उतरवल्याने सर्व सामान्यांमधून मनसेचे कौतुक होत असलं तरी मनसेने कायदा हातात घेणं ही चुकीचं आहे. खरं तर अशा बुलेटराजांचा बंदोबस्त पोलिसांनी लावणं अपेक्षित आहे. आता अशा बुलेटराजांवर पिंपरी चिंचवड वाहतूक पोलीस योग्य ती कडक कारवाई करतील अशीच अपेक्षा आहे.