नवी दिल्ली (Pclive7.com):- दिल्ली विधानसभेसाठी आज (दि.०५) मतदान होत आहे. सत्तारूढ आम आदमी पक्ष (आप) विरोधात भारतीय जनता पक्ष तसेच काँग्रेस असा तिरंगी सामना होईल. राजधानीत एकूण एक कोटी ५६ लाख मतदार आहेत. मतटक्का वाढविण्यासाठी विविध व्यावसायिकांनी सवलती जाहीर केल्या आहेत.
अरविंद केजरीवाल यांचा ‘आप’ सलग तिसऱ्यांदा सत्तेत येण्याच्या प्रयत्नशील आहे. भाजपने यंदा जोरदार प्रचारमोहीम राबवली. दिल्लीत २६ वर्षांनंतर सत्तेत येण्याची त्यांना आशा आहे. काँग्रेसने तगडी लढत दिली असून, गेल्या दोन विधानसभा निवडणुकांत एकही जागा जिंकता आलेली नाही. आम आदमी पक्षाने प्रचारात सुशासनाच्या मुद्द्यावर भर दिली. तसेच सरकारच्या कल्याणकारी योजना केजरीवाल तसेच मुख्यमंत्री अतिशी यांनी प्रचारातून मांडल्या. भाजपकडून पंतप्रधान नरेंद्र मोदी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा तसेच पक्षाध्यक्ष जे.पी.नड्डा यांनी प्रचारात आप सरकारवर टीकास्त्र सोडले. तर विरोधी पक्षनेते राहुल गांधी तसेच सरचिटणीस प्रियंका गांधी यांनी काँग्रेसच्या प्रचाराची धुरा सांभाळली. ८ फेब्रुवारीला मतमोजणी होईल. मतदान किती होते त्यावर निकालाचे गणित अवलंबून आहे. मतदानानंतर सलून तसेच ब्युटी पार्लरमध्ये २० ते ५० टक्के सवलत उद्योग व व्यापार संघटनेने (सीटीआय) जाहीर केली. पाचशे दुकानदारांनी या योजनेत सहभाग घेतल्याचे संघटनेने जाहीर केले. मतटक्का वाढावा यासाठी या योजना असल्याचे चेंबर ऑफ ट्रेड अँड इंडस्ट्रीजचे (सीटीआय) अध्यक्ष ब्रिजेश गोयल यांनी सांगितले. हॉटेल तसेच मॉलमध्येही मतदान केल्यावर १० ते ५० टक्के सवलत मिळेल.
राजकीय पक्षांची आश्वासने
शीशमहल, यमुना नदीच्या प्रदूषणाची समस्या तसेच मतदार याद्यांमध्ये घोळ झाल्याचा आरोप प्रचारादरम्यान करण्यात आला. जाहीरनाम्यात ‘आप’ने विद्यार्थ्यांना मोफत प्रवास, रिक्षा तसेच टॅक्सी चालकांसाठी विमा, पुजारी, गुरुद्वारा ग्रंथींसाठी १८ हजार रुपये देण्याचे आश्वासन दिले. भाजपने गर्भवतींना २१ हजारांची मदत, स्वयंपाकाचा गॅस सिलिंडर अनुदानित म्हणजे ५०० रुपयांत देण्याचे जाहीर केले. काँग्रेसने बेरोजगारांना प्रतिमहिना साडेआठ हजार देऊ असे आश्वासन दिले.
एकूण जागा ७०
मतदार १ कोटी ५६ लाख
मतदान केंद्र १३ हजार ७६६
एकूण उमेदवार ६९९
Tags: अरविंद केजरीवालआम आदमी पार्टीकाँग्रेसतिरंगी लढतदिल्ली विधानसभा निवडणूकनरेंद्र मोदीभाजपाराहुल गांधी