देहू (Pclive7.com):- श्रीक्षेत्र देहूत गॅस कटरने एटीएम फोडण्याचा प्रयत्न चोरट्यांनी केला आहे. देहूत, विठ्ठलवाडी रस्त्यावर मध्यरात्री मंगळवारी (दि.२७) दोन ते अडीच च्या दरम्यान हे एटीएम फोडण्याचा प्रयत्न करण्यात आला. मात्र चोरीची घटना लक्षात येताच नागरिकांनी या एटीएम चोरांना पकडले. यावेळी तीन जण कारमधून पळून जाण्यात यशस्वी झाले तर दोन चोरट्यांना नागरिकांनी पकडून देहूरोड पोलिसांच्या ताब्यात दिले. देहूमध्ये मागील काही दिवसांपासून चोरट्यांचा सुळसुळाट पहायला मिळत आहे. त्यामुळे रात्री पोलिसांनी गस्त वाढवावी अशी मागणी आता देहूकर करू लागले आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, देहू आळंदी रोडवर इंडसइंड बँकेचे एटीएम सेंटर आहे. या एटीएम सेंटरमध्ये मंगळवारी पहाटे पाच जण चोरी करण्याच्या उद्देशाने आले. आरोपींनी गॅस कटरच्या साह्याने एटीएम कापण्याचा प्रयत्न केला.
दरम्यान हा प्रकार स्थानिक नागरिकांना समजला. नागरिकांनी पोलिसांना माहिती दिली. देहूरोड पोलीस आणि स्थानिक नागरिकांच्या मदतीने चोरी करणाऱ्या दोन आरोपींना पकडण्यात आले. दरम्यान तीन आरोपी कार मधून पळून गेले. देहूरोड पोलीस तपास करीत आहेत.