रजनीकांतचा अर्धशतकी तेजस्वी प्रवास “थलैवा” @५०; ‘मुन्ना, झुंड मे तो सुअर आते है, शेर अकेला ही आता है’
पिंपरी (Pclive7.com):- एका सर्वसामान्य कुटुंबातील होतकरू मुलगा ते जागतिक पातळीवर लोकप्रियतेच्या शिखरावर पोहोचलेला सुपरस्टार. सर्वच स्तरातील प्रेक्षकांना आवडणारा अभिनय, सिगारेट पेटवणे असो की गॉगल लावण्याची विशिष्ट शैली, अफाट लोकप्रियता आणि तरीही अत्यंत साधेपणा….या सर्व बाबींचा समावेश असणारा हरहुन्नरी कलावंत म्हणून रजनीकांतकडे पाहिले जाते. चित्रपटसृष्टीशी संबंधित कसलीही पार्श्वभूमी नसलेला, तरीही शून्यातून विश्व निर्माण केलेला. करिश्मा, साधेपणा आणि प्रेरणेची अद्वितीय कहाणी असणारा रजनीकांत हा खऱ्या अर्थाने भारतीय चित्रपटसृष्टीतील “थलैवा” ठरला आहे. “थलैवा” हा एक तामिळ शब्द आहे. याचा अर्थ नेता, बॉस किंवा प्रमुख व्यक्ती असा आहे. एखाद्या व्यक्तीच्या सन्मानार्थ हा शब्द वापरला जातो. सुपरस्टार रजनीकांत “थलैवा” याच नावाने ओळखले जातात.

भारतीय चित्रपटसृष्टीत आजवर अनेक दिग्गज कलाकार झाले, परंतू, वर्षानुवर्षे प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवण्याचे भाग्य मोजक्याच कलाकारांना लाभते, त्यामध्ये सुपरस्टार रजनी अर्थात रजनीकांत यांचे नाव अग्रस्थानी ठेवावे लागेल. १९७५ मध्ये रजनीकांत यांचा सिनेसृष्टीतील प्रवास सुरू झाला. तेव्हापासून आतापर्यंत १७० हून अधिक चित्रपटांमध्ये काम करताना त्यांनी सर्वाधिक तामिळ सिनेमे केले. हिंदी, तेलगू, मल्याळी, कन्नड आणि बंगाली चित्रपटांमध्येही काम केले. मात्र, मराठी कुटुंबाची पार्श्वभूमी असूनही आतापर्यंत एकाही मराठी सिनेमात रजनीकांत झळकले नाहीत. २०२५ मध्ये ते कारर्कीर्दीचा सुवर्णमहोत्सव साजरा करत आहेत. आजमितीला जगात सर्वाधिक मानधन घेणाऱ्यांच्या यादीत रजनीकांतचा वरचा क्रमांक आहे.
कर्नाटकात जन्म, तामिळनाडूत कारकीर्द..
१२ डिसेंबर १९५० रोजी कर्नाटकात बंगळुरू येथे जन्म झालेल्या रजनीकांत यांचे मूळ नाव शिवाजीराव गायकवाड आहे. ते वंशाने मराठी आहेत. त्यांचे कुटुंब महाराष्ट्रात पुणे जिल्ह्यातील पुरंदर तालुक्यातील मावडी कडेपठार या गावाशी जोडलेले आहे. रजनीकांत यांचे वडील रामोजीराव हे पोलीस हवालदार होते. तर आई जिजाबाई गृहिणी होत्या. रजनीकांत यांचे लहानपण आर्थिकदृष्ट्या कठीण परिस्थितीत गेले. अनेक छोटी-मोठी कामे केल्यानंतर पोटापाण्यासाठी त्यांनी बस कंडक्टरची नोकरी केली. तेथूनच राजबहादूर या सहकाऱ्याच्या मदतीने त्यांचा पुढे तमिळनाडूत चित्रपटक्षेत्रात प्रवेश झाला.

दिग्दर्शक के. बालचंदर यांनी त्यांचे नामकरण केले. प्रेक्षकांना सहज लक्षात राहील, असं रजनीकांत हे नाव त्यांनीच दिले. ‘अंधारात उजळणारा प्रकाश’ असा रजनीकांत या नावाचा अर्थ आहे. १९७५ मध्ये आलेल्या “अपूर्व रागंगळ” या तमिळ चित्रपटातून त्यांनी पदार्पण केले. ‘बिल्ला’ या सिनेमाने खऱ्या अर्थाने त्यांना ओळख मिळवून दिली. थलपथी, अन्नामलाई, बाशा, मन्नान, मुथू, पडयप्पा, अरूणाचलम, चंद्रमुखी, शिवाजी-द बॉस, एंथियन (रोबोट), २.०, पेटा, कबाली, काला, अन्नाथे, दरबार, जेलर, कुली अशा अनेक चित्रपटांमुळे रजनीकांत हे नाव म्हणजे प्रेक्षकांसाठी उत्साहाचं प्रतीक बनलं. संवादफेकीची खास शैली, वेगळा अॅक्शन अंदाज, करिश्माई व्यक्तिमत्त्व आणि साधेपणामुळे त्यांना ‘थलैवा’ (लीडर-नेता) ही पदवी मिळाली.
रजनीकांतच्या चित्रपटांच्या प्रदर्शनावेळी त्यांच्या होर्डिंगला दुग्धाभिषेक केला जातो. चंदेरी पडद्यावर सिनेमाच्या नामावलीत ‘सुपर स्टार रजनी’ असे नाव ठळकपणे झळकते, तेव्हा सिनेमागृहात टाळ्या आणि शिट्ट्यांचा पाऊस पडतो. सिनेमात त्यांची पहिली झलक दिसताच थिएटरमध्ये कल्लोळ होतो. पडद्यावर नाणी उधळली जातात. ‘मुन्ना, झुंड मे तो सुअर आते है, शेर अकेला ही आता है, आणि ‘क्यो हिला डाला ना’ यासारखे असंख्य संवाद व ते सादर करण्याची विशिष्ट शैली हे रजनीकांतचे वैशिष्ट्य आहे. सिनेमा हिंदी असो तामिळ की इतर कोणत्याही भाषेतील असो. दमदार आणि कडक संवाद हे ठरलेले असतात. याशिवाय, बुलेट चालवणे, सिगारेट पेटवणे, गॉगल घालणे, केसांवरून हात फिरवणे, शर्ट कमरेच्या मागे सारणे, डौलदार पध्दतीने चालणे, खाली बसणे, उठून उभे राहणे, वेगळ्याच धाटणीची फायटिंग स्टाईल…अशा सर्व गोष्टींचा प्रेक्षक मनमुरादपणे आनंद लुटतात. अशी कोणतीही गोष्ट नाही, की जे रजनीकांत पडद्यावर साकारू शकत नाही, अशी रजनी फॅन्सची भावना दिसून येते. केवळ भारतातच नव्हे तर जगभरात रजनीकांतचे चाहते आहेत. त्यांच्यावरील प्रेमापोटी रजनीकांत यांचे मंदिरही तामिळनाडूत मदुराई येथे बांधण्यात आले आहे.

राजकारणात प्रवेश, नंतर ‘यू टर्न’..
चित्रपटसृष्टीतील यशस्वी कारकीर्दीनंतर आणि लोकप्रियतेच्या शिखरावर असताना २०१७ मध्ये रजनीकांत यांनी तमिळनाडूतील राजकारणात प्रवेश करणार असल्याचे जाहीर केले. ‘मी माझा स्वतचा पक्ष स्थापन करणार असून पुढील विधानसभा निवडणुकीत सर्व २३४ जागांवर उमेदवार उभा करणार आहे. ही जनतेची लढाई आहे’, अशी भूमिका तेव्हा रजनीकांत यांनी तामिळी जनतेसमोर मांडली. निवडणुकांच्या दृष्टीने जोरदार तयारी सुरू केली. रजनीकांत राजकारणात उतरणार म्हणून तामिळनाडूतील राजकीय समीकरणे झपाट्याने बदलणार होती. रजनीकांत यांच्या लोकप्रियतेचा धसका केवळ राज्यातील राजकारण्यांनी घेतला होता, असे नाही. तर केंद्रीय स्तरातील नेतृत्वालाही रजनीकांत नावाची धडकी भरली होती. मात्र, २०२० मध्ये आरोग्याच्या कारणास्तव राजकारणात जाण्याचा निर्णय रजनीकांत यांनी मागे घेतला. ‘निवडणुकीत सहभागी होणे माझ्या आरोग्याशी खेळणे असून माझ्या प्रिय जनतेची दिशाभूल करणे होईल’, असे रजनीकांत यांनी तेव्हा स्पष्ट केले होते.
राजकारणात प्रवेश केला नसला तरीही रजनीकांत यांच्या व्यक्तीमत्वाचा प्रभाव आजही टिकून आहे. वैयक्तिक आयुष्यात ते अतिशय साधेपणाने वावरतात. प्रत्यक्ष जीवनात ते कोणत्याही प्रकारचा मेकअप तथा भडक पेहराव टाळतात. अध्यात्म, समाजकारण आणि मानवी मूल्ये यांना ते विशेष महत्त्व देतात. जनमाणसात असलेली त्यांची लोकप्रियता आजही कायम आहे, हे ऑगस्ट २०२५ मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘कुली’ सिनेमाला मिळालेल्या भरभरून यशावरून दिसून येते.

अमिताभ बच्चनचा पगडा..
रजनीकांत यांच्यावर महानायक अमिताभ बच्चन यांचा प्रचंड प्रभाव होता आणि अजूनही आहे. रजनीकांत यांना मिळालेल्या अभूतपूर्व यशात अमिताभचा मोठा वाटा मानला जातो. गेल्या ४० वर्षांपासून या दोघांची मैत्री आहे. अमिताभ आपले प्रेरणास्थान असून ते गुरूस्थानी आहेत, अशी भावना रजनीकांतने अनेकदा व्यक्त केली आहे. जाहीर समारंभात रजनीकांतने अमिताभचे चरणस्पर्श केल्याचेही दिसून येते.
‘बिल्ला’ (१९८०) या तामिळ सिनेमाने रजनीकांतला स्टार अभिनेत्याचा दर्जा मिळवून दिला. हा चित्रपट अमिताभच्या ‘डॉन’ या हिंदी सिनेमाचा रिमेक होता. बॉक्स ऑफीसवर बिल्ला सिनेमा कमालीचा यशस्वी ठरला. अमिताभच्याच दीवार, त्रिशूल, रोटी कपडा और मकान, लावारिस, खुद्दार, मर्द, नमक हलाल, कस्मे वादे, हम या गाजलेल्या सिनेमांचे दाक्षिणात्य भाषांमध्ये रिमेक झाले. त्यात रजनीकांतने अमिताभची भूमिका केली. जवळपास सर्व सिनेमे कमालीचे यशस्वी ठरले. ‘अमर अकबर अँथोनी’ आणि ‘खून पसीना’च्या रिमेकमध्ये रजनीकांतने अमिताभऐवजी विनोद खन्नाची तर, ‘मजबूर’ रिमेकमध्ये प्राणने केलेली व्यक्तीरेखा साकारली. हिंदी सिनेमांमध्ये अमिताभ आणि रजनीकांत यांनी ‘अंधा कानून’ (१९८३), ‘गिरफ्तार’ (१९८५) आणि ‘हम’ (१९९१) या तीन सिनेमांत एकत्र काम केले. तीनही सिनेमे यशस्वी ठरले.
याशिवाय, भगवानदादा, चालबाज, जीत हमारी, गंगवा, जॉन जॉनी जनार्दन, महागुरु, असली नकली, दोस्ती दुश्मनी, उत्तर दक्षिण, गैरकानूनी, भ्रष्टाचार, फरिश्ते, खून का कर्ज, फूल बने अंगारे, त्यागी, इंसानियत के देवता, आतंक ही आतंक, बुलंदी, लिंगा, पेटा, कबाली, काला, दरबार यांसारख्या अनेक हिंदी चित्रपटांमध्येही काम केले. यातील काही सिनेमे हिंदीत डब करण्यात आले होते.
जन्म: १२ डिसेंबर १९५०, बेंगळुरू (कर्नाटक)
सुरुवातीला बस कंडक्टर म्हणून नोकरी
“मद्रास फिल्म इन्स्टिट्यूट”मध्ये (तामिळनाडू) अभिनयाचे शिक्षण
दिग्दर्शक के. बालचंदर यांच्या “अपूर्व रागंगळ” या तामिळ चित्रपटात पहिली संधी (१९७५)
प्रारंभी खलनायक व सहायक भूमिका
तामिळसह हिंदी, तेलुगू, कन्नड व बंगाली चित्रपटांतही काम
परंतू मराठीत एकाही सिनेमात काम नाही
पुरस्कार आणि सन्मान
पद्मभूषण (२०००)
पद्मविभूषण (२०१६)
दादासाहेब फाळके पुरस्कार (२०२१)
तमिळनाडू राज्य पुरस्कार, फिल्मफेअर साउथ पुरस्कार अशा अनेक विविध गौरवांनी सन्मानित.
एशिया वीक, फोर्ब्स इंडियाकडून सर्वात प्रभावशाली व्यक्ती म्हणून निवड
– बाळासाहेब जवळकर (जेष्ठ पत्रकार)