निगडी (Pclive7.com):- प्रभाग १५ मधील निगडी गावठाण येथील अगरवाल चेंबर्समधील शॉप क्रमांक ३ हा व्यावसायिक गाळा गेल्या २३ वर्षांपासून बंद अवस्थेत आहे. तीन वर्षांपूर्वी पालिकेच्या करसंकलन विभागाने थकबाकीमुळे हा गाळा सीलबंद केला होता. मात्र गेल्या दोन आठवड्यांपासून शेजारील व्यापाऱ्यांना कुबट व कुजक्या दुर्गंधीचा तीव्र त्रास सहन करावा लागत होता.

या पार्श्वभूमीवर सामाजिक कार्यकर्ते अरुण थोरात आणि स्थानिक व्यापाऱ्यांनी नगरसेवक राजू मिसाळ यांच्याकडे तक्रार केली. परिस्थितीचे गांभीर्य ओळखून मिसाळ यांनी निगडी विभागीय कार्यालयाचे प्रशासन अधिकारी देशपांडे यांच्याशी संपर्क साधत लेखी पत्रव्यवहार करून तात्पुरत्या स्वरूपात गाळा उघडण्याची विनंती केली. प्रशासनाने तातडीने हालचाल करत सीलबंद गाळा उघडण्यास परवानगी दिली.
गाळा उघडल्यानंतर आत अत्यंत अस्वच्छ स्थिती आढळून आली. साफसफाईदरम्यान सुमारे दहा पोती कबुतरांची विष्ठा गोळा करण्यात आली. तसेच अनेक कबुतरे, उंदीर व घुशी मृत अवस्थेत सापडले. त्यानंतर कीटकनाशक विभागाकडून तातडीने औषध फवारणी करण्यात आली, त्यामुळे परिसरातील दुर्गंधी कमी होण्यास मदत झाली.
नगरसेवक राजू मिसाळ यांनी स्वखर्चाने सफाई कर्मचारी उपलब्ध करून देत संपूर्ण गाळ्याची स्वच्छता करून घेतली. त्यांच्या तत्परतेमुळे व्यापाऱ्यांना मोठा दिलासा मिळाल्याची भावना उपस्थित व्यापाऱ्यांनी व्यक्त केली.
यावेळी बोलताना मिसाळ म्हणाले की, “पुण्यातील शाम मानकर यांच्या मुलीचे निधन कबुतरांच्या संसर्गामुळे झाल्याची घटना ताजी आहे. अशी परिस्थिती पुन्हा कोणावरही येऊ नये म्हणून आम्ही तातडीने कारवाई केली.” तसेच नागरिकांनी सुरू करण्यात आलेल्या हेल्पलाईन क्रमांक 6262225151 चा लाभ घ्यावा, असे आवाहनही त्यांनी केले.



















Join Our Whatsapp Group