राष्ट्रवादी काँग्रेसचे नगरसेवक संदीप वाघेरे यांच्या पाठपुराव्याला यश
पिंपरी (Pclive7.com):- पिंपरी चिंचवड शहरातील थकबाकीदार नागरिकांसाठी मोठा दिलासा देणारा निर्णय घेत पिंपरी चिंचवड महानगरपालिकाने १ मार्च २०२६ पासून ‘अभय योजना’ लागू करण्याच्या सूचना दिल्या आहेत. या योजनेअंतर्गत मालमत्ता कराच्या विलंब दंडावर तब्बल ९० टक्के सवलत देण्यात येणार आहे. ही योजना १ मार्च ते ३१ मार्च २०२६ या कालावधीत राबविण्यात येणार आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे नगरसेवक संदीप वाघेरे यांनी पुणे महानगरपालिकेच्या धर्तीवर अभय योजना सुरू करण्याची मागणी पिंपरी चिंचवड महापालिका आयुक्तांकडे केली होती. त्यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्यानंतर अखेर प्रशासनाने ही योजना जाहीर केली आहे.

योजनेची वैशिष्ट्ये..
निवासी, बिगरनिवासी, औद्योगिक तसेच मोकळ्या जागांच्या मालमत्तांसाठी योजना लागू
थकीत मालमत्ता कराची संपूर्ण रक्कम एकरकमी भरल्यास विलंब दंडावर ९०% सवलत..
आर्थिक वर्ष २०२५-२६ मधील थकबाकीसह संपूर्ण देय रक्कम भरल्यासच सवलतीचा लाभ
थकबाकीची पार्श्वभूमी शहरातील सुमारे ५ लाखांहून अधिक मालमत्ताधारकांनी आतापर्यंत सुमारे ७४७ कोटी रुपयांचा मालमत्ता कर भरला आहे. वसुली मोहिमेला गती देण्यासाठी महापालिकेच्या १८ विभागीय कार्यालयांमार्फत विशेष पथके कार्यरत आहेत. जनजागृतीसाठी विविध माध्यमांचा वापर केला जात आहे.
तथापि, अजूनही सुमारे २ लाख १२ हजार ४४० मालमत्ताधारकांकडे कर थकीत आहे. या पार्श्वभूमीवर महसूल वाढीसाठी आणि नागरिकांना दिलासा देण्यासाठी प्रशासनाने हे विशेष पाऊल उचलले आहे.
महसूल वाढीची अपेक्षा नगरसेवक वाघेरे यांनी दिलेल्या पत्रात नमूद केले होते की, अनेक नागरिकांना कोरोना काळातील आर्थिक अडचणींमुळे वेळेत कर भरणे शक्य झाले नाही. वाढत्या विलंब शुल्कामुळे त्यांच्यावर अतिरिक्त आर्थिक ताण निर्माण झाला आहे. अभय योजनेमुळे करदात्यांना दिलासा मिळून प्रलंबित वसुलीला गती मिळेल आणि अंदाजे ९०० ते १००० कोटी रुपयांपर्यंत महसूल जमा होण्याची शक्यता आहे.
नागरिकांना आवाहन..
“१ मार्च ते ३१ मार्च २०२६ या कालावधीत थकीत मालमत्ता कराचा एकरकमी भरणा करून ९०% विलंब दंड सवलतीचा लाभ घ्यावा. शहराच्या विकासासाठी कर भरणे ही आपली सामूहिक जबाबदारी आहे,” असे आवाहन नगरसेवक संदीप वाघेरे यांनी केले आहे. ही योजना थकबाकीदारांसाठी आर्थिक दिलासा ठरणार असून महापालिकेच्या महसूल वाढीस चालना देणारी ठरणार आहे.
Tags: Sandeep Waghere



















Join Our Whatsapp Group