पिंपरी (Pclive7.com):- चिंचवड स्टेशन परिसरात बांधकाम व्यावसायिकांकडून रात्री-अपरात्री काम केले जाते. त्यामुळे मोठ्या प्रमाणात ध्वनी प्रदुषण होत आहे. त्याचा नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. याबाबत महापालिकेकडे तीन वेळा तक्रार करून देखील त्याची दखल घेतली जात नसल्याचा आरोप शिवसेना नगरसेविका मिनल यादव यांनी केला आहे. तसेच रात्रीच्या वेळी चालणारे बांधकामाचे काम त्वरित थांबवावे, अन्य तीव्र आंदोलन करण्यात येईल असा इशाराही त्यांनी दिला आहे.
याबाबत प्रसिध्दीस दिलेल्या पत्रकात मिनल यादव यांनी म्हटले आहे की, चिंचवड स्टेशनकडून केएसबी चौकाकडे जाणाऱ्या रस्त्यावर एक खाजगी बांधकाम सुरू आहे. याठिकाणी मोठ्या प्रमाणात खोदकाम सुरू आहे. हे खोदकाम जेसीबी, पोकलंडच्या सहाय्याने दिवस-रात्र सुरू आहे. याठिकाणी ब्लास्टिंग देखील करण्यात येते. रात्रीच्या वेळेतही हे काम सुरू असते. त्यामुळे मोठ्या प्रमाणात ध्वनी प्रदुषण होत आहे. या सुरू असलेल्या बांधकामामागे मोठ्या संख्येने गृहप्रकल्प आहेत. येथील नागरिकांना या प्रदुषणाचा नाहक त्रास होत आहे. नागरिकांनी याबाबत वारंवार तक्रारी केल्या आहेत. तीन-चार वेळी पत्र पाठवून देखील महापालिका याकडे लक्ष देत नाही. नागरिकांच्या आरोग्याकडे दुर्लक्ष करून बांधकाम व्यवसायिकाला अभय दिला जात आहे. या बांधकामाचे रात्रीच्या वेळी सुरू असलेले काम त्वरित थांबवावे, अन्यथा तीव्र आंदोलन करण्यात येईल असा इशारा शिवसेना नगरसेविका मिनल यादव यांनी दिला आहे.