पिंपरी चिंचवड गुन्हे शाखा युनिट १ ची कारवाई
पिंपरी (Pclive7.com):- अंडरवर्ल्ड डॉन अरुण गवळीच्या अखिल भारतीय सेनेच्या मावळ तालुका अध्यक्ष तिघांना पिंपरी चिंचवड गुन्हे शाखा पोलिसांनी अटक केली आहे. पिस्तूल बाळगल्याप्रकरणी ही कारवाई करण्यात आली आहे. अटक केलेल्या तिघांकडून दोन गावठी पिस्तूल आणि पाच जिवंत काडतुसे जप्त करण्यात आली आहेत.
चरण बाळासाहेब ठाकर (वय २६, रा.दारुंब्रे ता.मावळ), प्रदीप शिवाजी खांडगे (वय.२८, रा. पांगरी, ता.खेड) आणि राजू शिवलाल परदेशी (वय.५९, रा. दत्तवाडी, कुसगाव बुद्रुक, ता. मावळ) अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत.
याबाबत पोलीसांनी दिलेली माहिती अशी की, पोलीस कर्मचारी गणेश सावंत यांना माहिती मिळाली की, इंद्रायणी हॉस्पिटल समोर केळगाव रोड आळंदी येथे एक व्यक्ती पिस्तूल विकण्यासाठी येणार आहे. त्यानुसार पोलिसांनी इंद्रायणी हॉस्पिटल समोर सापळा रचून चरण ठाकर याला ताब्यात घेतले. त्याच्याकडे एक देशी बनावटीचे पिस्तूल आणि एक जिवंत काडतूस मिळाले. पोलिसांनी हा ऐवज जप्त करत त्याला अटक केली. आळंदी पोलीस ठाण्यात त्याच्या विरोधात महाराष्ट्र पोलीस कायदाअन्वये गुन्हा दाखल करण्यात आला. पोलीस तपासात चरण ठाकर याची चौकशी केली असता, त्याने त्याच्या ओळखीचा प्रदीप खांडगे याच्याकडून पिस्तूल विकत घेतले असल्याचे सांगितले. त्यानुसार पोलिसांनी प्रदीप खांडगे याचा शोध घेऊन त्याला अटक केली. दोघांची कसून चौकशी केली असता, त्यांनी मध्य प्रदेश राज्यातून दोन पिस्तूल आणले आहेत. त्यातील एक पिस्तूल चरणाला विकले. तर दुसरे पिस्तूल कुसगाव लोणावळा येथील त्याचा मित्र राजु परदेशी यांना विकले असल्याची माहिती प्रदीप खांडगे यांनी दिली. त्यानुसार पोलिसांनी राजू परदेशी यांना देखील अटक केली. तिघांकडून दोन पिस्तूल आणि पाच जिवंत काडतुसे असा ऐवज जप्त करण्यात आला आहे. आरोपी चरण ठाकरे हा पोलिस रेकॉर्डवरील गुन्हेगार आहे. तसेच अंडरवर्ल्ड डॉन अरुण गवळी याच्या अखिल भारतीय सेनेचा मावळ तालुका अध्यक्ष आहे. त्याच्यावर तळेगाव पोलिस ठाण्यात मारहाणीचे आणि दारू विक्रीचे गुन्हे दाखल आहेत. तर प्रदीप खांडगे याच्यावर दुखापतीचे गुन्हा दाखल आहे.
ही कारवाई पोलीस आयुक्त आर.के.पद्मनाभन, अप्पर पोलीस आयुक्त मकरंद रानडे, सहाय्यक पोलिस आयुक्त सतीश पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखा युनिट १ चे वरिष्ठ पोलीस निरीक्षक उत्तम तांगडे, सहाय्यक पोलीस निरीक्षक गणेश पाटील, पोलीस निरीक्षक काळूराम लांडगे, पोलीस कर्मचारी प्रमोद वेताळ, प्रमोद लांडे, मनोजकुमार कमले, सावन राठोड, अमित गायकवाड, सचिन उगले, प्रवीण पाटील, विशाल भोइर, गणेश सावंत यांच्या पथकाने केली.