पिंपरी (Pclive7.com):- शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त तसेच शिवसेनेच्या ५३ व्या वर्धापनदिनानिमित्त पर्यावरण रक्षण करणारा उपक्रम राज्यभर राबविण्यात येणार आहे. त्याअंतर्गत पिंपरी चिंचवड शहरात ‘वृक्षवेलींच्या स्वरूपात शिवसेना आपल्या घरात’ या अनोख्या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. याच्या माध्यमातून पिंपरी विधानसभा मतदार संघातील नागरिकांना ५४ हजार रोपांचे वाटप करण्यात येणार आहे, अशी माहिती शिवसेनेचे नगरसेवक ॲड. सचिन भोसले यांनी आज पिंपरी येथे आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत दिली.
यावेळी शहरप्रमुख योगेश बाबर, महिला संघटिका उर्मिला काळभोर, नगरसेवक निलेश बारणे, प्रमोद कुटे, नगरसेविका अश्विनी चिंचवडे, रेखा दर्शिले, अनिता तुतारे, अनंत कोऱ्हाळे, विजय दर्शिले आदी उपस्थित होते.
शिवसेना प्रमुख, हिंदू हृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांची ८० टक्के समाजकारण आणि २० टक्के राजकारण ही शिकवण प्रत्यक्ष अंमलात आणून हा उपक्रम राबविला जाणार आहे. त्यानिमित्त मावळचे खासदार श्रीरंग बारणे यांच्या मार्गदर्शनाखाली पिंपरी परिसरात पर्यावरण संतुलन आणि संवर्धनासाठी जनजागृती करीत ५४ हजार रोपांचे वाटप करण्यात येणार आहे.
या उपक्रमाची सुरुवात शनिवारी (२७ जुलै २०१९) सकाळी मुंबईत मातोश्रीवर पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना रोप भेट देऊन करण्यात येणार आहे. त्यानंतर पिंपरी परिसरातील नागरिकांना घरोघरी जाऊन रोपांचे वाटप करण्यात येईल. पर्यावरण संतुलन आणि संवर्धन ही काळाची गरज असून, त्यासाठी पुढाकार घेऊन काम करणे गरजेचे आहे. प्रत्येक नागरिकांनी आपल्या मुलांच्या भविष्यासाठी एक झाडं लावणे गरजेचे आहे. त्यासाठी अशा योजना राबविणे गरजेचे आहे. पिंपरी परिसरातील नागरिकांना वृक्षांचे वाटप करून, त्याचे महत्त्व पटवुन दिले जाणार आहे. परिसरातील सर्व नागरिकांनी या योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन नगरसेवक सचिन भोसले यांनी केले आहे.
पुढे बोलताना सचिन भोसले म्हणाले की, पिंपरी विधानसभेतून आपण तीव्र इच्छुक आहोत. शिवसेना प्रमुखांनी विश्वास टाकून उमेदवारी दिल्यास पिंपरीत पुन्हा भगवा फडकवू असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.