पिंपरी (Pclive7.com):- गेल्या २४ तासांत पाणलोट क्षेत्रात दमदार पाऊस झाल्याने पिंपरी चिंचवडला पाणीपुरवठा करणारे पवना धरण जवळजवळ ५५ टक्के भरले आहे. पावसाळा उशिरा सुरू झाल्याने पवना धरणाचा पाणीसाठा १३ टक्क्यांपर्यंत खाली गेला होता. मात्र १ जून पासून पाऊस सुरू झाल्याने दररोज पाणीसाठ्यात भर पडू लागली आहे. गेल्या २४ तासांत धरणक्षेत्रात १७९ मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे. त्यामुळे पाण्यासाठ्यात ५.९५ टक्क्यांनी वाढ झाली आहे.
सध्या धरणात ५४.५१ टक्के (५.७४ टीएमसी) पाणीसाठा आहे. गेल्यावर्षी आजच्या तारखेला धरण ९५.८० टक्के भरले होते. पवना धरण क्षेत्रात या पावसाळ्यात एकूण १३७६ मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे. गेल्यावर्षी या तारखेपर्यंत २१११ मिलीमीटर पाऊस पडला होता. यंदा उशिरा पाऊस सुरू झाला आहे. गेल्या काही दिवसांत तर पावसाने पाठ फिरवली होती. त्यामुळे धरण साठ्यात वाढ होत नसल्यामुळे पिंपरी चिंचवडकरांची चिंता वाढली होती. मात्र गेल्या दोन दिवसापासून पावसाने पुन्हा जोर धरल्यामुळे शहरवासियांना दिलास मिळाला आहे. या पावसाळ्यात पाणीसाठ्यात ४०.०५ टक्के वाढ झाली असून त्यापैकी ५.९५ टक्के म्हणजेच सुमारे सहा टक्के वाढ कालच्या एका दिवसात झाली आहे.