पिंपरी (Pclive7.com):- पिंपरी चिंचवडसह मावळवासियांची तहान भागविणाऱ्या पवना धरणात ६२.६५ टक्के (६.४३ टीएमसी) पाणीसाठा झाला आहे. पाणलोट क्षेत्रात गेल्या २४ तासात १६० मिलीमीटर पाऊस झाला असून १ जूनपासून पाणलोट क्षेत्रात १५३६ मिमी पावसाची नोंद झाली आहे.
मावळातील पवना धरणातून पिंपरी चिंचवड शहर आणि मावळ परिसरातील भागाला पाणीपुरवठा केला जातो. रावेत बंधाऱ्यातून पाणी उपसा करुन महापालिकेतर्फे शहरवासियांना पाणीपुरवठा केला जातो. यंदा महापालिकेने टप्पा-टप्प्याने पाणी कपात केली. पहिल्यांदा आठवड्यातून एकदा तर त्यामध्ये वाढ करत एकदिवसाआड पाणीपुरवठा सुरु केला आहे. जुलैच्या पहिल्या आठवड्यात पावसाने दमदार हजेरी लावली होती. परंतु, त्यानंतर दहा दिवस पावसाने दडी मारली. आता पावसाला सुरुवात झाली आहे. दरम्यान, धरणातील पाणीसाठ्यात वाढ होत असली. तरी, महापालिकेने सावध पाऊले टाकत तुर्तास पाणीकपात रद्द केली नाही.