पिंपरी (Pclive7.com):- पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या स्थायी समिती सभापतीपदाची लॉटरी कोणाला लागणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. स्थायीच्या सभापतीपदासाठी सोमवारी (दि.२) रोजी दुपारी ३ ते ५ या वेळेत अर्ज दाखल करायचे आहेत. त्यामुळे अर्ज दाखल झाल्यानंतर सभापती कोण होणार? हे स्पष्ट होणार असून सभापतीपदाची प्रत्यक्ष निवडणूक शुक्रवारी (दि.६) दुपारी १२ वाजता होणार आहे. स्थायी समितीमध्ये भाजपचे बहुमत असून शीतल शिंदे हे प्रबळ दावेदार मानले जात आहेत. परंतू सभापती पदासाठी संतोष लोंढे, भीमाबाई फुगे, सुवर्णा बुर्डे, अभिषेक बारणे यांच्या नावाची चर्चा सुरू आहे.
महापालिकेच्या स्थायी समितीत १६ सदस्य असतात. भाजपचे १०, राष्ट्रवादी काँग्रेसचे ४, शिवसेना १ आणि अपक्षांचा १ अशा संख्याबळानुसार स्थायी समितीत सदस्य नियुक्त झाले आहेत. दोन वर्षाच्या कार्यकाळ संपलेल्या सदस्यांच्या जागी बुधवारी (दि.२६) रोजी भाजपच्या शशिकांत कदम, अंबरनाथ कांबळे, संतोष कांबळे, अभिषेक बारणे, सुवर्णा बुर्डे, भीमाबाई फुगे आणि राष्ट्रवादीच्या पोर्णिमा सोनवणे, सुलक्षणा शिलवंत यांची समितीत निवड करण्यात आली. अपक्ष सदस्य भाजपसोबत आहेत. भाजपचे स्थायीत बहुमत असल्याने भाजपचा सभापती होणार हे स्पष्ट आहे.
पुणे विभागीय आयुक्त डॉ. दिपक म्हैसेकर यांनी स्थायी समिती सभापतीपदाचा निवडणूक कार्यक्रम जाहीर केला आहे. त्यानुसार सोमवारी (दि.२) दुपारी ३ ते सायंकाळी ५ या वेळेत नामनिर्देशन पत्रे स्वीकारली जाणार आहेत. ६ मार्च रोजी दुपारी १२ वाजता सभापती पदासाठी निवडणूक होणार आहे. निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून पुणे महापालिकेच्या अतिरिक्त आयुक्त रुबल अग्रवाल कामकाज पाहणार आहेत, अशी माहिती पिंपरी महापालिकेचे नगरसचिव उल्हास जगताप यांनी दिली.