पिंपरी (Pclive7.com):- पिंपरी-चिंचवड शहरात उन्हाची तीव्रता दिवसेंदिवस वाढत असून तापमानाने तब्बल ३८.५ अंश सेल्सिअसचा टप्पा गाठला आहे. सकाळी नऊ वाजल्यापासूनच उन्हाचा चटका जाणवू लागल्याने नागरिक हैराण झाले आहेत. दुपारच्या वेळेत उन्हाची तीव्रता अधिक वाढत असल्याने रस्त्यांवर वर्दळ कमी झाल्याचे चित्र दिसून येत आहे.

वाढत्या उष्णतेमुळे नागरिक घराबाहेर पडणे टाळत असून, अत्यावश्यक कामांशिवाय बाहेर जाणे कमी झाले आहे. या पार्श्वभूमीवर प्रशासनाने नागरिकांना विशेष दक्षता घेण्याचे आवाहन केले आहे. दुपारच्या वेळेत घराबाहेर न पडण्याचा सल्ला देण्यात आला असून, बाहेर पडताना डोके झाकणे, पाणी पिणे आणि हलके कपडे परिधान करणे आवश्यक असल्याचे सांगण्यात आले आहे.

दरम्यान, महानगरपालिकेच्या वैद्यकीय विभागाने उष्माघाताचा धोका लक्षात घेऊन विशेष कक्ष कार्यान्वित केले आहेत. नागरिकांनी कोणतीही लक्षणे जाणवल्यास त्वरित वैद्यकीय मदत घ्यावी, असेही प्रशासनाने स्पष्ट केले आहे.

उष्णतेपासून दिलासा मिळवण्यासाठी घराघरात पंखे, एअर कुलर आणि एसीचा वापर वाढला असून त्यामुळे शहरातील विजेच्या मागणीतही वाढ झाल्याचे दिसून येत आहे.



















Join Our Whatsapp Group