पिंपरी (Pclive7.com):- पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेचे स्थायी समिती सभापती विलास मडिगेरी यांनी त्यांच्या कार्यकाळातील शेवटच्या सभेत ट्रिपल सेंचुरी केली आहे. महापालिकेच्या विविध विकासकामांसाठी तब्बल १५९ विषयांसाठी सुमारे ३५० कोटींच्या कामांना स्थायी समितीने शुक्रवारी (दि.२८) मंजुरी दिली. सायंकाळी साडेपाचला सुरू झालेले सभेचे कामकाज रात्री नऊला संपले. समितीचे अध्यक्ष विलास मडिगेरी यांची यांच्या अध्यक्षतेखाली शेवटची सभा असल्याने अधिकाधिक विषयांना मंजुरी देण्याचा प्रयत्न अखेरच्या क्षणापर्यंत करण्यात आला. सभेसमोर विषयपत्रिकेवर एकूण २६ विषय होते. त्यापैकी संत तुकारामनगर येथील आचार्य अत्रे रंगमंदिरातून दुरुस्ती कामाच्या वाढीव ४५ लाख खर्चाचा विषय पुन्हा तहकूब करण्यात आला. तो विषय पुन्हा समितीसमोर न आणण्याची उपसूचना मंजूर करण्यात आली. उर्वरित सर्व २५ विषय मंजूर करण्यात आले.
तर, तब्बल १३४ ऐनवेळेच्या विषयांना मंजुरी देण्यात आली. त्यात बर्ड व्हॅली उद्यानात लेझर शो विकसित करणे. रस्ते, ड्रेनेज, उद्यान, पदपथ, पाणीपुरवठा आणि स्थापत्यविषयक असे मुख्य कामे आहेत. विषयपत्रिका व ऐनवेळचे एकूण १५९ विषयांसाठी सुमारे ३५० कोटीं खर्चास मंजुरी देण्यात आली.दरम्यान, सभेपुढे अधिकाधिक विषय यावेत म्हणून अध्यक्ष मडिगेरी हे सकाळपासूनच महापालिका भवनात ठाण मांडून होते. सभेत सुरुवातीला तासभर अध्यक्षपद सदस्य राजेंद्र गावडे यांनी भूषविले. शिवसेनेचे गटनेते राहुल कलाटे यांनी विरोध केल्याने आयत्या वेळेचे काही विषय मागे घेण्यात आले. भाजपमधील नगरसेवकांमध्ये असलेला वाद आणि स्वीपर मशिनने रस्ते सफाई कामास मंजुरी दिली जाण्याची शक्यता असल्याने वाद होण्याची शक्यता होती. त्याचे पडसाद सभेत होऊ नये म्हणून प्रशासनाने मोठा पोलिस बंदोबस्त ठेवला होता. मात्र, अखेरपर्यंत रोड स्वीपरने रस्ते सफाई खर्चास मान्यतेचा विषय सभेसमोर येऊ शकला नाही.





















Join Our Whatsapp Group