पिंपरी (Pclive7.com):- कोरोना विषाणूचा वाढणारा संसर्ग रोखण्यासाठी पिंपरी चिंचवडमधील सर्वात मोठी कंपनी असलेल्या टाटा मोटर्सने आपले उत्पादन बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. येत्या मंगळवार दि. २५ ते ३१ मार्चपर्यंत सात दिवस कंपनीचे उत्पादन बंद ठेवण्यात येणार असल्याचे कंपनीचे व्यवस्थापकीय संचालक गुंटर बुटशेक यांनी एका पत्रकाद्वारे घोषणा केली आहे.
गुंटर बुटशेक यांनी पत्रकात म्हटले आहे, “कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी कंपनीच्या वतीने विविध उपाययोजना करण्यात आल्या आहेत. कंपनीत १९ मार्चपासून विभागवार कामगारांचे दोन गट दिवसाआड काम सुरू ठेवून कारखान्यात एका वेळी कामावर असणाऱ्या कर्मचाऱ्यांची संख्या निम्म्यावर आणण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. परंतु महाराष्ट्रात पुणे जिल्ह्यात सर्वाधिक कोरोनाबाधित रुग्ण आढळले असून परिस्थिती दिवसेंदिवस गंभीर बनत चालली आहे. या पार्श्वभूमीवर सामाजिक जबाबदारीचे भान ठेवून तसेच कर्मचाऱ्यांच्या सुरक्षिततेचा विचार करून कंपनीने पुणे प्रकल्प काही दिवसांसाठी पूर्णपणे बंद ठेवण्याचा निर्णय घेतला.
पुणे प्रकल्प बंद करण्याची प्रक्रिया सोमवारी (२३ मार्च) मध्यरात्री सुरू करून मंगळवारी (२४ मार्च) मध्यरात्रीपर्यंत प्रकल्प पूर्ण बंद करण्याचे नियोजन करण्यात आले आहे. कोरोना हा संसर्गजन्य आजार असून त्याचा प्रसार रोखण्यासाठी शासन तसेच स्थानिक प्रशासन करीत असलेल्या प्रयत्नांना सहकार्य करण्याची भूमिका कंपनी व्यवस्थापनाने घेतली आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेल्या आवाहनानुसार २२ मार्चला सकाळी सात ते रात्री नऊ दरम्यान होणाऱ्या ‘जनता कर्फ्यू’मध्ये सहभागी होण्यासाठी कंपनी व्यवस्थापनाने कंपनीचे अधिकारी व कर्मचारी यांना प्रोत्साहीत केले आहे. या आव्हानात्मक परिस्थितीमध्ये कंपनीच्या सर्व अधिकारी व कर्मचाऱ्यांनी सहकार्य केले आहे. कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी सोशल डिस्टन्सिंगचा अवलंब करून स्वतःची व आपल्या प्रियजनांची काळजी घ्या, असे आवाहनही त्यांनी केले आहे.”
























Join Our Whatsapp Group