पिंपरी (Pclive7.com):- पिंपरी चिंचवडमध्ये गेल्या सहा दिवसांत कोरोनाचा एकही पॉझिटिव्ह रूग्ण आढळला नसून १२ बाधित रूग्णांवर महापालिकेच्या रूग्णालयात उपचार सुरू आहेत. यासर्व रूग्णांची प्रकृती स्थिर असून पहिल्या तीन रूग्णांचे रिपोर्ट निगेटिव्ह आलेत. दरम्यान शहरात १३०६ जणांना ‘होम क्वारंटाईन’मध्ये ठेवण्यात आले आहे. तर प्रशासनाकडून आज दि.२६ अखेर शहरातील ४ लाख ४७ हजार ३६९ नागरिकांचे सर्वेक्षण करण्यात आले असल्याची माहिती महापालिकेच्या वैद्यकीय विभागाकडून देण्यात आली आहे.
पिंपरी चिंचवड शहरातील कोरोना विषाणुच्या प्रादुर्भावामुळे ‘होम क्वारंटाईन’ करण्यात आलेल्या नागरिकांची संख्या १३०६ असून त्या सर्वांनी किमान १४ दिवसासाठी व आवश्यकता भासल्यास पुढील २८ दिवसांपर्यत घरातच थांबण्याच्या सूचनांचे पालन करावे. तसेच सुचनांचे पालन न करणाऱ्या ‘होम क्वारंटाईन’ मधील नागरिकांवर कायद्यानुसार कारवाई करण्यात येणार असून सूचनांचे उल्लंघन करणाऱ्या नागरिकांना पोलिसांमार्फत ताब्यात घेवून पुढील १४ दिवसांपर्यत संस्थात्मक अलगीकरण (क्वारंटाईनची) व्यवस्था केलेल्या ठिकाणी राहावे लागेल. या आदेशाचे उल्लघन करणा-यांना कायद्यानुसार सहा महिन्यांपर्यंत शिक्षेची तरतुद असून नागरिकांनी सर्व सुचनांचे पालन करावे असे आवाहन महापौर उषा उर्फ माई ढोरे व पक्ष नेते नामदेव ढाके यांनी केले आहे.
पिंपरी चिंचवड महापालिकेच्या यशवंतराव चव्हाण स्मृती रुग्णालय व नविन भोसरी रुग्णालयामधून आज दि.२६ पर्यंत एकुण १६९ व्यक्तींचे कोरोना (कोविड १९) करीता घश्यातील द्रव्यांचे नमुने एनआयव्ही, पुणे येथे तपासणी करीता पाठविण्यात आले आहेत. पैकी आज अखेर १२९ व्यक्तींचे अहवाल निगेटिव्ह आलेले आहेत. आज कोरोना (कोविड १९) या आजाराच्या एकुण पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या १२ आहे. सर्व रुग्णांची प्रकृती स्थिर असून त्यांचेवर महापालिकेच्या यशवंतराव चव्हाण स्मृती रुग्णालय व नविन भोसरी रुग्णालयांमधील आयसोलेशन कक्षामध्ये उपचार सुरु आहेत. तसेच आज दि.२६ रोजी एकुण २७ व्यक्तींना नविन भोसरी रुग्णालय व यशवंतराव चव्हाण स्मृती रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आलेले असून त्यांचे कोरोना (कोविड १९) करीता घश्यातील द्रव्याचे नमुने एनआयव्ही, पुणे येथे तपासणी करीता पाठविण्यात आले आहेत. कोरोना संसर्गजन्य आजाराचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी पिंपरी चिंचवड मनपामार्फत नियुक्त करण्यात आलेल्या २४४ कर्मचारी यांची क्षेत्रीय सर्वेक्षण टिम घरोघरी जाऊन सर्वेक्षण करीत आहेत. आज अखेर शहरातील ४ लाख ४७ हजार ३६९ नागरिकांचे सर्वेक्षण करण्यात आले आहे.
परदेश प्रवास करुन चीन, डेमोक्रेटिक रिपब्लीक ऑफ कोरिया, फ्रान्स, जर्मनी, स्पेन, इटली, इरान, दुबई, सौदी अरेबिया, युनायटेड स्टेट्स ऑफ अमेरिका, कतार, ओमान, कुवेत आणि युनाटेड अरब अमिरात या देशांमधुन आलेल्या सर्व नागरिकांनी किमान १४ दिवस स्वत:हून घरामध्येच (Home Quarantine) मध्ये रहावे व जे नागरिक घरामध्ये (Home Quarantine) राहणार नाहीत अशा नागरिकांचे संस्थात्मक अलगीकरण करण्यात येवुन त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करण्यात येईल. तसेच उपरोक्त नमूद देशांमधून प्रवास करुन आलेल्या नागरिकांनी याबाबतची माहिती आपल्या घराजवळील महापालिकेच्या दवाखाना किंवा रुग्णालयात तातडीने द्यावी असे पिंपरी चिंचवड महापालिकेच्या वतीने आवाहन करण्यात येत आहे. पिं.चिं. मनपामार्फत हेल्प लाईन कार्यान्वित करण्यात आलेली आहे. सदर हेल्पलाईन क्रमांक ८८८८००६६६६ हा आहे. तसेच ९९२२५०१४५० हा Whatsapp क्रमांक कार्यान्वित करण्यात आलेला आहे. राज्य शासनामार्फत कार्यान्वित idsp.mkcl.org या संकेतस्थळावर संशयित कोरोना रुग्ण संबंधित माहिती देण्याचे आवाहन नागरीक तथा सर्व वैद्यकीय व्यावसायिक यांना महापालिका प्रशासनाकडून करण्यात आले आहे.






















Join Our Whatsapp Group