पिंपरी (Pclive7.com):- पिंपरी चिंचवड शहरात कोरोना विषाणूचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी महापालिका प्रशासन यंत्रणा कामाला लागली असताना पिंपरी प्रभागात नगरसेविका उषा वाघेरे आणि संजोग वाघेरे पाटील मित्र परिवाराचे सदस्य प्रशासनाच्या मदतीसाठी व कोरोनाशी दोन हात करण्यासाठी रस्त्यावर उतरले आहे.
कोरोना विषाणूमुळे संपूर्ण शहरात भीतीचे वातावरण आहे. संपूर्ण शहरात लॉकडाऊन करण्यात आले आहे. अशा परिस्थितीत संजोग वाघेरे पाटील मित्र परिवाराचे सदस्य कोरोना विषाणूशी लढण्यासाठी सज्ज झाले आहेत. हे सदस्य महापालिका कर्मचाऱ्यांच्या खांद्याला खांदा लावून सर्वसामान्य नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी रस्त्यावर उतरून काम करत आहेत. संपूर्ण पिंपरी प्रभागातील सोसायट्या, झोपडपट्टी, चाळी, पिंपरी मार्केट, कॅम्प परिसरात दिवसातून दोन वेळा धूर आणि औषधांची फवारणी करण्यात येत आहे.
दरम्यान, नागरिकांमधील भीती आणि चिंतेचे वातावरण पाहता नगरसेविका उषा वाघेरे यांनी आवाहन केले आहे की, कोरोना विषाणूपासून संरक्षण करण्यासाठी नागरिकांनी संयम बाळगून आरोग्य विभागाने दिलेल्या सूचनांचे काटेकोर पालन करणे आवश्यक आहे. आमच्या मित्र परिवाराचे सदस्य २४ तास तुमच्या मदतीसाठी उपलब्ध असून आपण सर्वजण मिळून या कोरोना नावाच्या संकटाचा नायनाट करूयात.






















Join Our Whatsapp Group