पिंपरी (Pclive7.com):- राज्यात कोरोना विषाणूचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता नगरसेवक शत्रुघ्न काटे युथ फाउंडेशनच्या वतीने पिंपळे सौदागर प्रभागात महापालिका प्रशासनाच्या मदतीवर अवलंबून न राहता स्वखर्चातून कोरोना प्रतिबंधक औषधांची फवारणी करण्यास सुरुवात केली आहे. दरम्यान यावेळी औषध फवारणीसाठी कोणत्याही कर्मचाऱ्यांची वाट न बघता नगरसेवक शत्रुघ्न काटे आणि पवना बँकेचे संचालक जयनाथ काटे यांनी स्वतः हाती फवारा घेत फवारणी केली.

गेल्या काही दिवसांत पुण्यातील वाढत्या कोरोना रुग्णसंख्येच्या धर्तीवर नगरसेवक शत्रुघ्न काटे यांच्याकडून पिंपळे सौदागर प्रभागातील विविध सोसायटी आणि लोकवस्तीचा आढावा घेण्यात येत आहे. नगरसेवक काटे हे स्वतः दररोज प्रभागात फिरून परिसरातील स्वच्छता आणि कोरोना प्रतिबंधात्मक उपाययोजनांची पाहणी करीत आहेत. तसेच नागरिकांच्या काही तक्रारी असतील तर त्यादेखील वैयक्तिक पातळीवर सोडविण्याचा प्रयत्न करीत आहेत.
नगरसेवक शत्रुघ्न काटे आणि पवना बँकेचे संचालक जयनाथ काटे यांनी आज (सोमवारी) एकत्रितरीत्या संपूर्ण प्रभागात खाजगी टँकरद्वारे औषध फवारणी केली. यावेळी नगरसेवक शत्रुघ्न काटे युथ फाउंडेशनचे सदस्यांनीही त्यांना सहकार्य केले.
यावेळी बोलताना नगरसेवक काटे म्हणाले की, कोरोना विषाणू विरोधात सुरू असलेली लढाई सोपी नसून एकट्या पिंपरी चिंचवड महापालिका प्रशासनावर त्याचा भार न टाकता एक लोकप्रतिनिधी या नात्याने कर्तव्य म्हणून आम्ही स्वतः स्वखर्चाने प्रभागात फवारणी करण्यास सुरुवात केली आहे. पिंपळे सौदागर हा माझा प्रभाग असून या ठिकाणी राहणाऱ्या नागरिकांच्या आरोग्याची काळजी घेण्याची जबाबदारी देखील माझीच आहे. व जोपर्यंत हा कोरोना विषाणू देशाबाहेर जात नाही तोपर्यंत ही जबाबदारी समर्थपणे पार पाडू, असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला.






















Join Our Whatsapp Group