पिंपरी (Pclive7.com):- भारतात सुरु असलेल्या कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर राज्यभरात रक्ताचा तुटवडा निर्माण झालेला आहे. हा रक्ताचा तुटवडा भरून काढण्यासाठी राज्य सरकारने केलेल्या आवाहनाला साथ देत नगरसेवक संदीप वाघेरे युवा मंचच्या वतीने रक्तदान शिबिराचे आज आयोजित करण्यात आले होते. या रक्तदान शिबिरात पिंपरीतील अनेक युवकांनी सहभाग नोंदवून उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.
नगरसेवक संदीप वाघेरे आणि संदीप वाघेरे युवा मंच व विश्व सिंधी सेवा संगम यांच्या संयुक्त विद्यमाने आज पिंपरी येथील नागरी सुविधा केंद्र या ठिकाणी हे शिबिर पार पडले. या शिबिरामध्ये ५० रक्तदात्यांनी रक्तदान केले. विशेष म्हणजे यामध्ये महिला रक्तदात्यांची संख्या देखील लक्षणीय होती.
यावेळी बोलताना नगरसेवक संदीप वाघेरे म्हणाले की, कोरोना विषाणू हे देशावर आलेले महाभयंकर संकट असून या संकटाचा प्रत्येकाने एकजुटीने सामना करण्याची आवश्यकता आहे. देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे कोरोना विरोधात खंबीरपणे उभे राहून लढत आहेत. अशावेळी या छोट्याशा उपक्रमाच्या माध्यमातून या लढाईत आपलेही योगदान देण्याचा आमचा प्रयत्न असून आजच्या रक्तदान शिबिरात सहभागी होऊन रक्तदान करणाऱ्या सर्व नागरिकांचे आणि विशेषतः महिला भगिनींचे आभार व्यक्त करतो.
दरम्यान, हे शिबिर यशस्वी करण्यासाठी रंजना जाधव, हरिष वाघेरे, जयेश चौधरी, श्रीकांत वाघेरे, किरण वाघेरे, गणेश मंजाळ, किरण शिंदे यांनी विशेष प्रयत्न केले व कर्मचारी यांचे आभार नगरसेवक संदीप बाळकृष्ण वाघेरे यांनी मानले.






















Join Our Whatsapp Group