पिंपरी (Pclive7.com):- कोरोना विषाणू संसर्गामुळे आपत्कालीन परिस्थिती उदभवली आहे. या कालखंडामध्ये शहरातील गरजू व्यक्तींपर्यंत अन्न आणि शिधा पोहचविण्यासाठी महानगरपालिका स्वयंसेवी संस्थांच्या माध्यमातून समन्वय साधत आहे. या कार्यात सहभागी झालेल्या स्वयंसेवकांनी स्वतःची काळजी घेऊन प्राप्त परिस्थितीमध्ये आपले योगदान द्यावे असे आवाहन अतिरिक्त आयुक्त अजित पवार यांनी केले.
कोरोना विषाणूमुळे प्रादूर्भाव रोखण्यासाठी शासन स्तरावर विविध आदेश आणि सूचना देण्यात येत आहेत. कोरोनामुळे देशपातळीवर लॉकडाऊन करण्यात आले आहे. या परिस्थितीत हातावर पोट असणा-यांच्या उपजिवीकेचा प्रश्न निर्माण झाला आहे. या बिकट परिस्थितीतून मार्ग काढण्यासाठी काही स्वयंसेवी संस्था आणि व्यक्ती पुढे सरसावल्या आहेत. या माध्यमातून पिंपरी चिंचवड शहरातील गरजू व्यक्तींना अन्न आणि शिधा देण्यात येणार आहे. यासाठी महापालिका समन्वयक म्हणून काम करणार आहे. यामध्ये विविध स्वयंसेवी संस्था व कार्यकर्ते सहभागी झाले आहेत. या प्रक्रियेचे कामकाज कशा पद्धतीने चालणार आहे याबाबत पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या मुख्य प्रशासकीय भवनात आज विविध स्वयंसेवी संस्थांच्या प्रतिनिधींसमवेत बैठक संपन्न झाली.
या बैठकीस मुख्य माहिती व तंत्रज्ञान अधिकारी नीलकंठ पोमण, आपत्ती व्यवस्थापन अधिकारी ओमप्रकाश बहिवाल, बांधकाम परवानगी व अतिक्रमण निर्मुलन विभागाचे कार्यकारी अभियंता शिरीष पोरेडडी यांच्यासह समप्रिया संस्थेचे साईप्रसाद, योगेश कौशिक, पृथ्वीराज पाटील, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे श्रीनिवास पुलय्या, योगेश सासवडे, सम्यक विद्यार्थी आंदोलन संघटनेचे संतोष जोगदंड, भिमशाही युवा संघटनेचे शिवशंकर उबाळे, विश्व हिंदू परिषदेचे नितीन वाटकर, रयत विद्यार्थी विचार मंचचे धम्मराज साळवे, संतोष शिंदे, थेरगाव सोशल फौंडेशनचे निलेश पिंगळे, राहुल सरवदे, समता सैनिक दलाचे मनोज गरबडे, बजरंग दलाचे कुणाल साठे, निसर्ग राजा मित्र जीवांचे संस्थेचे राहुल घोलप, संस्कार प्रतिष्ठानचे मोहन गायकवाड, अनुलोम संस्थेचे शिरीष भालेकर, कुणाल साळवी, सामाजिक कार्यकर्ते अमित पवार, धनंजय ढोरे, अमित पसरणेकर, विलास लांडगे, संदीप गव्हाणे, संतोष शेलार आदी उपस्थित होते.
यावेळी संगणकीय सादरीकरणाद्वारे उपस्थितांना कामकाजाची प्रक्रिया समजावून सांगण्यात आली. महानगरपालिकेने PCMC स्मार्ट सारथी अँप विकसित केले आहे. यामध्ये नागरिकांना त्यांच्या जवळील मेडिकल दुकाने, किराणा माल दुकाने, भाजीपाला केंद्रे आदी बाबतची माहिती मिळणार आहे. तसेच कोरोना (COVID-19 ) संबंधित विविध प्रकारचे सर्वेक्षण व नागरिकांमार्फत माहितीचे संकलन देखील या अँपमध्ये केले जाणार आहे. नागरिकांनी आपली माहिती या अँपद्वारे भरावी यासाठी या स्वयंसेवी संस्था व कार्यकर्त्यांनी महानगरपालिकेला सहकार्य करावे असे आवाहन अतिरिक्त आयुक्त अजित पवार यांनी यावेळी केले.
कोरोनामुळे उद्भवलेल्या परिस्थितीमुळे काही नागरिकांवर उपजिवीकेचा प्रश्न उद्भवला असल्याने त्यांच्यावरउपाशी राहण्याची वेळ आली आहे. यामध्ये वृध्द, दिव्यांग, अनाथ, निराधार, बेवारस यांच्यासह काही विद्यार्थी, कामगार, रोजंदारीवर काम करणारे व्यक्ती आदींचा समावेश आहे. या सर्वांना सध्याच्या आपत्कालीन परिस्थितीत अन्न आणि शिधा पुरविण्यासंदर्भात विविध स्वयंसेवी संस्था आणि व्यक्ती पुढे सरसावल्या आहेत. अन्न आणि शिधा याची गरज असणा-या व्यक्तींचा शोध घेवून त्यांच्या पर्यंत मदत पोहोचविण्यासाठी महापालिकेने समन्वय कक्ष स्थापन केला आहे. या कक्षाचे प्रमुख म्हणून सहाय्यक आयुक्त संदिप खोत काम पाहत आहेत. भोसरी येथील इंद्रायणीनगर मधील संत ज्ञानेश्वर क्रीडा संकूलातून या कक्षाचे काम सुरु झाले असून अतिरिक्त आयुक्त अजित पवार यांच्या मार्गदर्शनाखाली कामकाजाचे नियोजन केले आहे. या कामकाजासाठी स्वयंसेवी संघटनांचे कार्यकर्ते गरजूंपर्यंत प्रत्यक्ष मदत पोहचवण्यासाठी कार्यरत असणार आहेत.कोरोना (COVID-19) विषाणूंच्या संसर्गामुळे रुग्णांना चांगल्या वैद्यकीय सेवा पुरविणे आणि त्याचवेळी नागरिकांना जीवनावश्यक वस्तूंचा पुरवठा करणे अशा बिकट परिस्थितीला आपणा सामोरे जात आहोत. रुग्णांच्या संख्येमध्ये वाढ झाल्यास आपल्याला अधिक मनुष्यबळाची आवश्यकता भासणार आहे अशा वेळी शहरातील तरुण व निरोगी नागरिकांनी या मदत कार्यामध्ये स्वयंसेवक म्हणून सहभागी होऊन महानगरपालिकेला सहाय्य करावे असे आवाहन महापौर उषा उर्फ माई ढोरे व आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी केले आहे. ज्यांना या मदत कार्यामध्ये सहभागी होण्याची इच्छा आहे त्यांनी https://bit.ly/PCMCVOLUNTEER या लिंक वर जाऊन आपली नोंदणी करावी.






















Join Our Whatsapp Group