पिंपरी (Pclive7.com):- पिंपरी चिंचवड शहरातील ८ कोरोनाबाधित रुग्ण चार दिवसांत ठणठणीत बरे झाले होते. त्यानंतर आज पिंपरी चिंचवडमध्ये दिलासादायक वातावरण असून १५ मार्च रोजी दाखल केलेला १ रुग्ण ‘कोरोनामुक्त’ झाला आहेत. त्याचे दुसऱ्या चाचणीचे रिपोर्ट निगेटिव्ह आले असून त्यांना आज घरी सोडण्यात आले आहे. त्यामुळे शहरात कोरोनाच्या १२ पॉझिटिव्ह रूग्णांपैकी ९ जणांना डिस्चार्ज दिला असून केवळ ३ रूग्ण बाकी राहिलेत. महापालिकेच्या भोसरीतील नवीन रूग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू असून सर्वांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती प्रशासनाच्यावतीने देण्यात आली आहे.
पिंपरी चिंचवड शहरात १२ मार्च रोजी कोरोनाचे पहिले तीन रुग्ण ‘पॉझिटीव्ह’ आढळले होते. त्यापाठोपाठ रूग्णांच्या संख्येत मोठी वाढ झाली. चार दिवसांत एकूण १२ रुग्ण कोरोना ‘पॉझिटीव्ह’ आढळल्याने शहरात भितीचे वातावरण निर्माण झाले होते. त्यानंतर १४ दिवस उपचार घेतलेले रुग्ण ‘कोरोनामुक्त’ व्हायला सुरुवात झाली. त्यापैकी पहिले ३ रुग्ण शुक्रवारी (दि.२७) ‘कोरोनामुक्त’ होत ठणठणीत झाले होते, त्यांना घरी सोडण्यात आले. रविवारी (दि.२९) आणखी पाच रुग्णांचे १४ दिवसांनंतरचे रिपोर्ट ‘निगेटिव्ह’ आल्याने त्यांना घरी सोडले होते. आज रोजी कोरोनाच्या ‘पॉझिटिव्ह’ ०४ रुग्णांपैकी नवीन भोसरी रुग्णालयातील ज्या रुग्णांचा १४ दिवसाचा कालावधी पुर्ण झाले आहे अशा ०१ रुग्णाचे २४ तासातील घशातील द्रव्याचे लागोपाठ दोन नमुन्याचे अहवाल निगेटिव्ह आल्यामुळे त्यांना घरी सोडण्यात आलेले असून त्यांना घरामध्ये १४ दिवस अलगीकरणामध्ये राहण्याच्या सूचना देण्यात आलेल्या आहेत. त्यामुळे एकुण पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या आता ०३ आहे. सर्व रुग्णांची प्रकृती स्थिर असून त्यांचेवर महानगरपालिकेच्या यशवंतराव चव्हाण स्मृती रुग्णालय व नविन भोसरी रुग्णालयांमधील आयसोलेशन कक्षामध्ये उपचार सुरु आहेत.
पिंपरी चिंचवड शहरातील कोरोना विषाणुच्या प्रादुर्भावामुळे घरात विलगीकरणात असणाऱ्या नागरिकांची संख्या १४६३ असून त्या सर्वांनी किमान १४ दिवसासाठी व आवश्यकता भासल्यास पुढील २८ दिवसांपर्यत घरातच थांबण्याच्या सूचनांचे पालन करावे. तसेच सुचनांचे पालन न करणाऱ्या ‘होम क्वारंटाईन’मधील नागरिकांवर कायद्यानुसार कारवाई करण्यात येणार असून सूचनांचे उल्लंघन करणा-या नागरिकांना पोलिसांमार्फत ताब्यात घेवून पुढील १४ दिवसांपर्यत संस्थात्मक अलगीकरण (क्वारंटाईनची) व्यवस्था केलेल्या ठिकाणी राहावे लागेल. या आदेशाचे उल्लघन करणा-यांना कायद्यानुसार सहा महिन्यांपर्यंत शिक्षेची तरतुद असून नागरिकांनी सर्व सुचनांचे पालन करावे असे आवाहन महापौर उषा उर्फ माई ढोरे व पक्ष नेते नामदेव ढाके यांनी केले आहे.
पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या यशवंतराव चव्हाण स्मृती रुग्णालय व नविन भोसरी रुग्णालयामधून आज दि.३० पर्यंत एकुण २४३ व्यक्तींचे कोरोना (कोवीड १९) करीता घश्यातील द्रव्यांचे नमुने एनआयव्ही, पुणे येथे तपासणी करीता पाठविण्यात आले आहेत. पैकी आज अखेर २१० व्यक्तींचे अहवाल निगेटिव्ह आलेले आहेत. तसेच आज दि.३०/०३/२०२० रोजी एकुण २१ व्यक्तींना नविन भोसरी रुग्णालय व यशवंतराव चव्हाण स्मृती रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आलेले असून त्यांचे कोरोना (कोवीड १९) करीता घश्यातील द्रव्याचे नमुने एनआयव्ही, पुणे येथे तपासणी करीता पाठविण्यात आले आहेत.
कोरोना संसर्गजन्य आजाराचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी पिंपरी चिंचवड मनपामार्फत नियुक्त करण्यात आलेल्या २४४ कर्मचारी यांची क्षेत्रीय सर्वेक्षण टिम घरोघरी जाऊन सर्वेक्षण करीत आहेत. आज दि.३० अखेर शहरातील ५ लाख ४८ हजार ६२७ नागरिकांचे सर्वेक्षण करण्यात आलेले असून पिंपरी चिंचवड मनपामध्ये आज अखेर १४६३ व्यक्तींना घरातील अलगीकरण कक्षात ठेवण्यात आलेले आहे. घरातील अलगीकरणात असणा-या नागरिकांनी बाहेर पडू नये. अशी व्यक्ती बाहेर पडल्याचे आढळल्यास त्याची माहिती महानगरपालिकेच्या सारथी हेल्पलाईन ८८८८००६६६६ यावर कळवावी असे आवाहन महापौर उषा उर्फ माई ढोरे व पक्ष नेते नामदेव ढाके यांनी केले आहे.
कोरोना आजाराचे संक्रमण थांबविण्यासाठी पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचे वतीने सर्व नागरिकांना आवाहन करण्यात येते की अत्यावश्यक कारणाशिवाय घराच्या बाहेर पडु नये. तसेच फ्लुसारखी लक्षणे दिसून आल्यास नागरिकांनी तात्काळ वैद्यकीय तपासणी करुन घ्यावी. पिं.चिं. मनपामार्फत हेल्प लाईन कार्यान्वित करण्यात आलेली आहे. सदर हेल्पलाईन क्रमांक ८८८८००६६६६ हा आहे. तसेच ९९२२५०१४५० हा WhatsApp क्रमांक कार्यान्वित करण्यात आलेला आहे. राज्य शासनामार्फत कार्यान्वित idsp.mkcl.org या संकेतस्थळावर संशयित कोरोना रुग्ण संबंधित माहिती देण्याचे आवाहन नागरीक तथा सर्व वैद्यकीय व्यावसायिक यांना करण्यात येत आहे.






















Join Our Whatsapp Group