पिंपरी (Pclive7.com):- पिंपरी चिंचवड महापालिकेमार्फत शहरातील कमर्शियल मिळकती व्यवसाय व उद्योग आस्थापनांना मिळकतर आकारला जातो. मात्र कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी सुरू असलेल्या लॉकडाऊनमुळे शहरातील सर्व जनजीवन ठप्प आहे. त्यामुळे शहरातील सर्व कमर्शियल मिळकती तसेच व्यवसाय व उद्योग आस्थापनांचा लॉकडाऊनच्या काळातील सर्व प्रकारचा कर माफ करण्यात यावा, अशी सूचना चिंचवड विधानसभा मतदारसंघाचे आमदार लक्ष्मण जगताप यांनी महापालिका आयुक्त श्रावण हर्डीकर यांच्याकडे केली आहे.
यासंदर्भात आमदार लक्ष्मण जगताप यांनी महापालिका आयुक्त श्रावण हर्डीकर यांना निवेदन दिले आहे. त्यात म्हटले आहे, “पिंपरी-चिंचवडमध्ये हजारो उद्योग कार्यरत आहेत. याशिवाय कमर्शियल मिळकती आहेत. त्याचप्रमाणे हजारो नागरिक घरातच छोटे व्यवसाय व उद्योग चालवित आहेत. या सर्वांना पिंपरी-चिंचवड महापालिकेकडून विविध प्रकारचा कर आकारला जातो. सध्या कोरोना संसर्ग वाढू नये यासाठी संपूर्ण देश लॉकडाऊन आहे. त्यामुळे शहरातील सर्व जनजीवन ठप्प आहे. प्रत्येकजण घरात बसून लॉकडाऊनचे पालन करत देशसेवा करत आहे. जीवनावश्यक वस्तू वगळता एकही उद्योग किंवा व्यवसाय सुरू नाही. परिणामी उद्योग किंवा व्यवसाय करणाऱ्यांचे उत्पन्न पूर्णपणे बंद झाले आहे.
अशा स्थितीत सर्वसामान्यांसोबतच उद्योग आणि व्यवसाय करणाऱ्यांनाही माणुसकी म्हणून दिलासा देण्याची आवश्यकता आहे. त्यांनाही थोडा आधार मिळेल असा निर्णय होण्याची गरज आहे. त्यामुळे पिंपरी-चिंचवड महापालिकेने शहरातील कमर्शियल मिळकती, उद्योग व व्यवसायांना आकारण्यात येणारा सर्व प्रकारचा कर माफ करावा. ही माफी लॉकडाऊनच्या काळापुरती मर्यादित असावी, अशी सूचना आमदार जगताप यांनी केली आहे. तसा निर्णय घेतल्यास उद्योग व व्यवसाय करणाऱ्या सर्वांना लॉकडाऊन नंतर पुन्हा उभारी घेण्यासाठी धीर मिळेल, अशी आशाही त्यांनी व्यक्त केली आहे.”






















Join Our Whatsapp Group