पिंपरी (Pclive7.com):- कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लॉकडाऊनमुळे पिंपरी चिंचवड शहरातील सर्व यात्रा रद्द करण्यात आल्या आहेत. तळवडे गावचे ग्रामदैवत श्री भैरवनाथ महाराज यांची यात्रा साजरी होत नसल्याने यात्रेनिमित्त निमित्त ग्रामस्थांच्या वतीने भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्याय आले होते. या संयोजनात राष्ट्रवादी काँग्रेसचे नगरसेवक पंकज भालेकर यांनी पु़ढाकार घेतला. तळवडे गावठाण व समाज मंदिरात दि.१४ एप्रिल रोजी सकाळी ८ पासून दुपारी १ वाजेपर्यंत या शिबिरात अनेक रक्तदात्यांनी सहभाग घेतला.
राज्यात कोरोना रुग्णांची संख्या वाढत आहे. लॉकडाउन आणि संचारबंदीमुळे राज्यातील रक्तसाठा कमी झाला आहे. परिणामी, कोरोना व्यतिरिक्त अन्य रुग्णांना आवश्यक असणारे रक्तांची कमतरता जाणवू लागली आहे. त्यामुळे राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनीही नागरिकांनी सोशल डिस्टंसिंगच्या नियमांचे पालन करीत रक्तदान करावे. छोटी-छोटी रक्तदान शिबिरे आयोजित केली जावीत, अशी अपेक्षा व्यक्त केली होती. त्या आवाहनाला प्रतिसाद देत तळवडे ग्रामस्थांनी सहभाग नोंदवत रक्तदान शिबिराचे आयोजन केले होते.
या शिबिराला परिसरातील नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. तसेच, सोशल डिस्टंसिंगच्या नियमांचेही पालन करण्यात आले, अशी माहिती आयोजकांनी दिली. रक्तदान शिबिरात सहभागी झालेल्या रक्तदात्यांना सॅनिटाईझर वाटप करण्यात आले. तसेच ब्लड बँकचे प्रमाणपत्रही देण्यात आले.