पिंपरी (Pclive7.com):- पिंपरी चिंचवडमध्ये कोरोना रुग्णांच्या संख्येत दिवसेंदिवस वाढत आहे. महापालिकेच्या वैद्यकीय विभागाने आज सकाळी ११ वाजता दिलेल्या अहवालानुसार एका ४ वर्षाच्या मुलीसह चौघांचे रिपोर्ट ‘पॉझिटिव्ह’ आले आहेत. त्यामुळे शहरातील सध्या कोरोनाग्रस्त रूग्णांची संख्या ३५ वर पोहचली असून त्यातील ३१ रूग्णांवर वायसीएम तर ४ जणांवर पुण्यातील रूग्णालयात उपचार सुरू आहेत. दरम्यान शहरात आजपर्यंतच्या एकूण बाधित रूग्णांची संख्या ४८ झाली आहे. १२ जण पूर्णपणे बरे झाले असून त्यांना घरी सोडण्यात आले आहे. तर एकाचा मृत्यू झाला आहे.
पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या वैद्यकीय विभागाने दिलेल्या माहितीनुसार ७५ संशयित रुग्णांच्या घशातील द्रव्यांचे नमुने बुधवारी तपासणीसाठी राष्ट्रीय विषाणू विज्ञान संस्थेकडे (एनआयव्हीकडे) पाठविले होते. त्याचे रिपोर्ट आज उशीरा आले होते. त्यात एका ४ वर्षाची मुली आणि दोन महिलांचे रिपोर्ट पॉझिटिव्ह आलेत. तसेच एक पुरूषाचे रिपोर्टही पॉझिटिव्ह आलेत. या चौघांना कोरोनाची लागण झाल्याचे स्पष्ट झाले आहे. कोरोना बाधित रुग्णांच्या संपर्कात आलेले हे रुग्ण आहेत. त्यामध्ये ४ वर्षांची एक मुलगी, २२ आणि २९ वय असलेल्या दोन महिला रुग्ण आहेत. तर 46 वर्षांचा पुरुष आहे. हे चौघे रुग्ण खराळवाडी, गव्हाणे वस्ती, शास्त्री चौक भोसरी येथील आहेत.