पिंपरी (Pclive7.com):- कोरोनासारख्या वैश्विक महामारीचा सामना करण्यासाठी शासनाने दिलेल्या निर्देशाचे पालन करत पिंपळे सौदागर प्रभागातील नागरिकांना जीवनावश्यक वस्तू उपलब्ध करून देण्यासाठी नगरसेवक शत्रुघ्न काटे यांच्या मार्गदर्शनाखाली विविध प्रतिबंधात्मक उपाययोजना राबविण्यात येत आहेत. विशेषतः भाजीपाला तसेच फळे खरेदीसाठी होणारी गर्दी टाळण्यासाठी प्रभागात दोन ठिकाणी भाजी-फळे विकी केंद्र सुरू करण्यात आले आहेत.
नगरसेवक शत्रुघ्न काटे यांच्या पुढाकारातुन पिंपळे सौदागर परिसरातील राजमाता जिजाऊ उद्यान (कुणाल आयकॉन रोड) आणि गोविंद यशोदा चौक या दोन ठिकाणी दररोज सकाळी ११ ते सायंकाळी ४ या वेळेत नागरिकांसाठी भाजीपाला उपलब्ध करून देण्यात आला आहे.
यासंदर्भात बोलताना नगरसेवक शत्रुघ्न काटे म्हणाले की, पिंपरी चिंचवड शहरात गेल्या काही दिवसांत कोरोनाच्या रुग्णांमध्ये कमालीची वाढ झालेली आहे. ही बाब अतिशय चिंताजनक आहे. मात्र नागरिक अद्यापही गंभीर नसून जीवनावश्यक वस्तूंच्या खरेदीसाठी अनेक ठिकाणी अनावश्यक गर्दी पाहायला मिळत आहे. मात्र यामुळे कोरोना आजाराचा प्रसार जलद गतीने होण्याची भीती आहे. त्यामुळेच ही अनावश्यक गर्दी टाळण्यासाठी पिंपळे सौदागर परिसरात दोन ठिकाणी भाजीपाला विक्री केंद्र सुरू करण्यात आले असून कोणत्याही प्रकारची गर्दी न करता सर्व नागरिकांना भाजीपाला उपलब्ध करून देण्याचा आमचा प्रयत्न आहे. विशेषतः भाजीपाला खरेदीसाठी येणाऱ्या नागरिकांच्या सुरक्षेसाठी त्यांच्या शरीराचे तापमान तपासणे, त्यांचे स्प्रे-सॅनिटायजिंग करणे, हॅन्डवॉश सुविधेसह सोशल डिस्टन्सिंग पाळण्यासंदर्भात विशेष काळजी घेण्यात येणार आहे. तसेच नागरिकांच्या तापमान तपासणीची नोंदणीही करण्यात येणार असल्याचे नगरसेवक काटे यांनी यावेळी सांगितले.