पिंपरी (Pclive7.com):- कोरोनासारख्या वैश्विक महामारीचा सामना करण्यासाठी शासनाने दिलेल्या निर्देशाचे पालन करत पिंपरीगाव प्रभाग क्रमांक २१ मधील नागरिकांना जीवनावश्यक वस्तू उपलब्ध करून देण्यासाठी नगरसेविका उषाताई वाघेरे यांच्या मार्गदर्शनाखाली विविध प्रतिबंधात्मक उपाययोजना राबविण्यात येत आहेत. विशेषतः भाजीपाला तसेच फळे खरेदीसाठी होणारी गर्दी टाळण्यासाठी प्रभागात दोन ठिकाणी भाजी-फळे विकी केंद्र सुरू करण्यात आले आहेत. नगरसेविका उषाताई वाघेरे यांच्या पुढाकारातुन पिंपरीगावातील नवमहाराष्ट्र महाविद्यायलयाचे मैदान व जयहिंद हायस्कुलचे मैदान या दोन ठिकाणी दररोज सकाळी ११ ते सायंकाळी ४ या वेळेत नागरिकांसाठी भाजीपाला उपलब्ध करून देण्यात येणार आहे.
यासंदर्भात बोलताना नगरसेविका उषाताई वाघेरे म्हणाल्या की, पिंपरी चिंचवड शहरात गेल्या काही दिवसांत कोरोनाच्या रुग्णांमध्ये कमालीची वाढ झालेली आहे. ही बाब अतिशय चिंताजनक आहे. मात्र नागरिक अद्यापही गंभीर नसून जीवनावश्यक वस्तूंच्या खरेदीसाठी अनेक ठिकाणी अनावश्यक गर्दी पाहायला मिळत आहे. मात्र यामुळे कोरोना आजाराचा प्रसार जलद गतीने होण्याची भीती आहे. त्यामुळेच ही अनावश्यक गर्दी टाळण्यासाठी पिंपरीगाव परिसरात दोन ठिकाणी भाजीपाला विक्री केंद्र सुरू करण्यात आले असून कोणत्याही प्रकारची गर्दी न करता सर्व नागरिकांना भाजीपाला उपलब्ध करून देण्याचा आमचा प्रयत्न आहे. विशेषतः भाजीपाला खरेदीसाठी येणाऱ्या नागरिकांच्या सुरक्षेसाठी त्यांच्या शरीराचे तापमान तपासणे, त्यांचे स्प्रे-सॅनिटायजिंग करणे, हॅन्डवॉश सुविधेसह सोशल डिस्टन्सिंग पाळण्यासंदर्भात विशेष काळजी घेण्यात येणार आहे. तसेच नागरिकांच्या तापमान तपासणीची नोंदणीही करण्यात येणार असल्याचे नगरसेविका उषाताई वाघेरे यांनी यावेळी सांगितले. दरम्यान पिंपरीगावातील नवमहाराष्ट्र महाविद्यालयाच्या मैदानात माजी महापौर संजोग वाघेरे पाटील मित्र परिवारच्या वतीने आयोजित करण्यात येत असलेला शेतकरी आठवडे बाजार हा नेहमीप्रमाणे गुरुवारी सकाळी ११ ते सायंकाळी ४ पर्यंत चालू राहील असेही त्यांनी सांगितले.






















Join Our Whatsapp Group