पिंपरी (Pclive7.com):- सध्या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर संपूर्ण देश लॉकडाऊन असल्यामुळे अनेक गोरगरीबांवर मोठे संकट कोसळले आहे. अशा संकट काळात अनेक हातांनी मदतीचा ओघ या गरजू लोकांपर्यंत पोहचत आहे. माणसांवर उपासमार होऊ नये म्हणून मदत केली जात आहे. मात्र मुक्या जनावरांचे काय? याच विचारातून शिवशक्ती व्यायाम मंडळ सांगवी, नवी सांगवी परिसरातील भटक्या, बेवारस मुक्या जनावरांसाठी चारा-पाण्याची व्यवस्था करण्यासाठी पुढे सरसावली आहे.
संचारबंदीमुळे मुक्या प्राण्यांच्या चारा-पाण्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. एरव्ही कचराकुंडी परिसरात नागरिकांनी टाकलेल्या अन्नावर व भाजीविक्रेत्यांनी टाकलेल्या भाज्यांवर ही जनावरे आपली गुजरान करीत असतात. मात्र लॉकडाऊनमुळे गेली २०-२२ दिवस सांगवीतील या बेवारस गायी, छोटी वासरे व इतर जनावरांना चारा-पाणी मिळणे अवघड झाले आहे.
मुक्या जीवांसाठी शिवशक्ती व्यायाम मंडळाचे सल्लागार युवराजसिंह गायकवाड यांच्या संकल्पनेतून बेवारस जनावरांच्या चारा-पाण्याची व्यवस्था करण्याचा प्रयत्न केला जात आहे. मंडळाचे अध्यक्ष योगेश गायकवाड, मयूर अवचरे, योगेश काळे, तौसिफ हिप्परगी, सतीश खुंटे, महेश फाळके, सतीश बडे, अनिरुद्ध रौल, तनव भट, राहुल जाधव, संतोष बोधे आदींसह सर्व सदस्य यासाठी परिश्रम घेत आहे. सांगवीतील वेगवेगळ्या भागात असलेल्या जनावरांचा शोध घेऊन तेथे चारा-पाण्याची व्यवस्था केली जात आहे.






















Join Our Whatsapp Group