पिंपरी (Pclive7.com):- पिंपरी चिंचवड महापालिकेचे आयुक्त राजेश पाटील यांनी पदभार स्विकारला आहे. त्यांच्यासोबत दोन महिन्यांपासून रिक्त असलेल्या अतिरिक्त आयुक्तपदी विकास ढाकणे यांची नियुक्ती झाली आहे. आयुक्त आणि अतिरिक्त आयुक्त दोघांनीही आज पदभार स्वीकारला आहे.
ओडिशा केडरचे २००५ च्या बॅचचे आयएएस राजेश पाटील यांची आंतरराज्य प्रतिनियुक्तीने पिंपरी चिंचवड महापालिका आयुक्तपदी नियुक्ती झाली आहे. त्यांनी आज (दि.१५) मावळते आयुक्त श्रावण हर्डीकर यांच्याकडून पदभार स्वीकारला. तसेच महापालिका अतिरिक्त आयुक्तपदी विकास ढाकणे यांची नियुक्ती झाली आहे. त्यांनीही आजच पदभार स्वीकारला.
तत्कालीन अतिरिक्त आयुक्त संतोष पाटील यांची पुणे विभागीय आयुक्त कार्यालयात उपायुक्त (सामान्य) या पदावर १७ डिसेंबर २०२० रोजी बदली झाली. तेव्हापासून अतिरिक्त आयुक्तपद रिक्त होते. त्यांच्याजागी भारतीय रेल्वे सुरक्षा सेवेतील (IRPFS) विकास ढाकणे यांची नियुक्ती झाली आहे. ढाकणे उद्योग, खनिकर्म, मराठी भाषा विभागाचे मंत्री सुभाष देसाई यांच्याकडे विशेष कार्य अधिकारी म्हणून कार्यरत होते. त्यांची १२ फेब्रुवारी रोजी पिंपरी चिंचवड महापालिकेच्या अतिरिक्त आयुक्तपदी बदली झाली आहे. राज्य सरकारचे उपसचिव कैलास बधान यांनी याबाबदचा आदेश काढला आहे.
पदभार स्विकारताच आयुक्त लागले कामाला..!
आयुक्त पदाची सुत्रे स्विकारताच राजेश पाटील हे कामाला लागले आहेत. महापालिकेतील सर्वच विभागांची तातडीने बैठक बोलावून त्यांनी थोडक्यात आढावा घेतला. कोणता विभाग कोणाकडे आहे, याची प्राथमिक माहिती त्यांनी घेतली. लवकरच प्रत्येक विभागाचा स्वंतत्र आढावा ते घेणार आहेत.