पुणे (Pclive7.com):- पुण्यातील गुंड गजानन मारणे हा खुनाच्या गुन्ह्यातून निर्दोष सुटल्यानंतर तळोजा कारागृह ते पुण्यापर्यंत जंगी मिरवणूक काढल्याप्रकरणी कोथरूड पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करुन पोलिसांनी मारणेला ताब्यात घेतलं आहे. गजानन मारणेला ताब्यात घेण्यात आलं असून त्याच्या इतर साथीदारांचा शोध घेण्याचे काम सुरु आहे.
पुण्यात मागील काही वर्षात टोळी युद्ध मोठ्या प्रमाणावर पाहण्यास मिळाले होते. त्या पार्श्वभूमीवर अनेक गुंडावर पुणे पोलिसांनी मोक्का अंतर्गत कारवाई करीत कारागृहात रवानगी केली होती.
त्याच दरम्यान अमोल बधे, पप्पू गावडे आणि आणखी एकाच्या या खुनाच्या प्रकरणी गुंड गजानन मारणे याला मोक्का अंतर्गत कारागृहात त्याची रवानगी करण्यात आली होती. या खूनातून गजानन मारणेची निर्दोष मुक्तता झाल्यावर तळोजा कारागृहाबाहेर त्याचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
यावेळी जवळपास ३०० हून अधिक चारचाकी वाहने घेऊन मिरवणूक काढण्यात आली. कारागृहापासून थेट पुण्यापर्यंत एवढ्या मोठ्या संख्येने गाड्यांचा ताफा घेऊन घोषणाबाजी करणाऱ्या कार्यकर्त्यांच्या घोळक्यात मारणे पुण्यात पोहचला.
या जंगी मिरवणुकीचा व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला. मंगळवारी रात्री दहाच्या सुमारास कोथरूड पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला. या प्रकरणाची चौकशी करुन कारवाई करणार असल्याची माहिती दुपारीच गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई यांनी दिली होती. तुरुंगातून सुटल्यानंतर मिरवणूक काढणे हा प्रकार पूर्णपणे चुकीचा असल्याचं देसाई यांनी म्हटलं होतं.

























Join Our Whatsapp Group